Sangli Crime : तरुणांमधील विवाहाचा प्रश्न दिवसागणिक कठिण होत असतानाच फसवणाऱ्या टोळीचे प्रमाणही चांगलेच वाढत चालले आहे. सांगलीतून (Sangli News) फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. खोटे लग्न लावून  4 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्नाटकच्या नववधूसह पाचजणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बामणी (ता. खानापूर) येथील नवरदेव दीपक शिवाजी सावंत (वय 39) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नववधू लक्ष्मी मल्लाप्पा नलवडे (रा. बैलहोंगल, कर्नाटक), अंजना दिलीप मलाईगोल (रा. हुपरी, जि. कोल्हापूर), शिवानंद मठपती स्वामी, त्याची पत्नी (दोघेही रा. गोकाक, ता. बेळगाव) व उमेश वाजंत्री या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नेमका प्रसंग काय घडला?


दीपक सावंत याच्या विवाहासाठी गावातील (Sangli News) कलगोंडा पाटीलने शिवानंद स्वामीशी संपर्क साधला होता. स्वामीने कर्नाटकातील बैलहोंगलमधील लक्ष्मी नलवडेचा विवाह करण्याचे असल्याचे सांगितले. त्यानुसार गेल्यावर्षी 17 नोव्हेंबर रोजी बामणीत पाचजण रात्रीच्या सुमारास आले. त्यावेळी त्या टोळीने दीपककडे तीन लाख रुपये दिले, तरच मुलीचे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले. 


दीपकने गावातील काही लोकांना बोलवून चर्चा झाल्यानंतर त्यांना रोख 3 लाख 10 हजार दिले होते. त्यानंतर लग्नासाठी 1 लाख 59 हजार रुपयांचे दागिने केले.18 नोव्हेंबर रोजी बामणीत विवाह पार पडला. दुसऱ्या दिवशी मुलीचे नातेवाईक निघून गेले. त्यानंतर 24  नोव्हेंबर रोजी गावची यात्रा असल्याचे सांगत नववधू लक्ष्मीला नातेवाईक माहेरी घेऊन गेले. त्यानंतर ती बामणीला आलीच नाही. 


आणण्यासाठी गेल्यानंतर वाद 


नववधू आणण्यासाठी गेल्यानंतर त्याच्याशी वाद घालून त्याला परत पाठवण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दीपकने नववधू लक्ष्मी, अंजना, शिवानंद मठपती स्वामी व त्याची पत्नी आणि उमेश वाजंत्री यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा विटा पोलिसांत दाखल केला आहे. 


कोल्हापुरात बोगस लग्न लावून पैसे उकळणारी राज्यव्यापी टोळी जेरबंद! 


दरम्यान, अडचणीतील तरुणांना हेरून त्यांना लुबाडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur police) पकडून जेरबंद केली आहे. बनावट नवरीशी लग्न लावून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या राज्यव्यापी टोळीचा कुरुंदवाडमध्ये पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी पाच महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्यांनी फिर्याद द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. 


संध्या विजय सुपणेकर (रा. माळवाडी, भिलवडी ता. पलूस जि. सांगली) ज्ञानोबा रामचंद्र दवंड उर्फ संतोष ज्ञानदेव सुतार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) विश्वजित बजरंग जाधव, जगदीश बजरंग जाधव, वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगाडे ता. खानापूर जि. सांगली) शारदा ज्ञानोबा दवंड (रा. पंचवटी, नाशिक) दीपाली केतन बेलोरे (रा. हडपसर, पुणे) रेखा गंगाधर कांबळे (रा. अंबिकारोहिना ता. चाकूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या