Sangli News : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) आरेवाडी (ता. कामठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा देवाच्या यात्रेस रविवारी येळावी (ता. तासगाव) येथील गावडे बंधूंच्या मानाच्या गोडा नैवेद्याने उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोव्यातील सुमारे एक लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. आज (ता.27) सार्वजनिक गोडा नैवेद्य आहे. उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. उद्या (28 मार्च) मंगळवारी भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर तयारी केली आहे. 


रोहित पाटलांकडून पाण्याचे टँकर्स


यात्रेसाठी लाखोंची गर्दी होणार असल्याने आलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही, याबाबत यात्रा कमिटीसह  देवस्थान ट्रस्टकडून काटकोर नियोजन करण्यात येत आहे. भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरोग्य विभाग दक्षता घेत आहे. बिरोबा मंदिरातील दगडी टाकीसह मंदिर परिसरातील असणाऱ्या टाक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी भाविकांच्या सोयीसाठी दहा पाण्याच्या टँकरचा पुरवठा केला आहे. या टँकरच्या माध्यमातून यात्रेत फिरून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर व डॉ. विनय कारंडे यांच्या मार्गदर्शनात ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक बिरोबा बनात आहेत.


उद्या बिरोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस


पहिल्या दिवशी शंभरहून अधिक भाविक रुग्णांची तपासणी करण्यात आली. तहसीलदार बी. जे. गोरे यांनी दिलेल्या आदेशानुसार यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी बिरोबा देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व ग्रामपंचायत अथक परिश्रम घेत आहे. यात्रेत आलेल्या दुकानदारांना जागा वाटप करण्यात आले आहे. रविवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी बैलगाडी येणारे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. उद्या बिरोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. यासाठी यात्रा कमिटी आणि पोलिस प्रशासन सज्ज असून गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी आता पोलिस बंदोबस्त सैन्यात करण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या