सांगली : सांगलीमध्ये आर.आर. आबा गट विरुद्ध खासदार संजयकाका पाटील यांच्यात पाण्यावरून संघर्ष पेटला आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला मात्र भाजप नेते व माजी जिल्हाध्यक्षांनी सुमनताई आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. उपोषणस्थळी पहिल्याच दिवशी माजी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. एका बाजूला भाजप खासदार उपोषणाला विरोध करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्याच खासदारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.


पालकमंत्री सुरेश खाडे उपोषणस्थळी पोहोचले 


दरम्यान, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी उपोषणस्थळी जात भेट घेतली. भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, आबा कुटुंबाच्या आंदोलनाकडे सरकारने अद्याप हवा तसा प्रतिसाद दिला नाही. सरकारने तातडीने पाऊले टाकून सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी द्यावी. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा.


पाण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करू नका


दुसरीकडे तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पाण्यावरून आर.आर.आबा गट आणि खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणावर खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. पाण्यासाठी कोणीही राजकीय स्टंटबाजी करू नये, स्टंटबाजीमुळे राजकारण कडेला जात नसतं, मुख्यमंत्र्यांनी टेंभूच्या 8 टीएमसी पाण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अतिताईपणा करू नये, असा सल्ला संजयकाका पाटील यांनी दिला आहे.  


दरम्यान, उपोषणाच्या पूर्वसंध्येला टेंभूच्या विस्तारित प्रकल्पासाठी आठ टीएमसी पाणी मंजूर केल्याचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले. मात्र केवळ पाणी मंजूर करून आमच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. आम्हाला विस्तारित टेंभू योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पत्र द्यावे. त्यानंतर विस्तारित योजनेचे काम तात्काळ सुरू करावे. याबाबतची लेखी हमी द्यावी, अशी मागणी करत आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांनी आपण उपोषण करणारच, असे सांगितले होते. रोहित पाटील यांना कालपासूनच ताप होता. तशाही परिस्थितीत ते शेतकऱ्यांसाठी आजपासूनच्या उपोषणात सहभागी झाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या