सांगली : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. त्याचबरोबर सांगलीच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. 


जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती 


संजय राऊत म्हणाले की, चंद्रहार सांगलीचे प्रश्न संसदेत उठवेल आणि संसदेत मशाल पेटवेल. जयंत पाटील यांना (Sanjay Raut on Jayant Patil) सांगलीची जास्त माहिती असल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे काँग्रेसच्या विश्वजित कदम यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये जनावरला जरी विचारलं तरी ते काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सांगेल, अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी दिली होती. 


सांगलीत काही वेगळं घडेल हे डोक्यातून काढून टाका


दरम्यान, संजय राऊत पुढे म्हणाले की, मोदी ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्यांना हाकलून देण्याची सुरुवात करायची आहे. सांगलीच्या खासदाराला तडीपारची नोटीस आज सांगलीची जनता देत आहे. कोरोनामध्ये गो गो कोरोनाचा नारा देण्यात आला होता. आता गो गो मोदी घोषणा द्यायच्या आहेत. ते पुढे म्हणाले की, मी जयंत पाटील, काँग्रेसचे विश्वजित कदम,विक्रम सावंत यांचे आभार मानतो. मविआ एकत्र असून त्यामुळे सांगलीत काही वेगळं घडेल हे डोक्यातून काढून टाका, असेही त्यांनी सांगितले.


जयंत पाटील म्हणाले, माझा काहीही संबंध नाही


दुसरीकडे, या सभेमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या सांगलीमध्ये सुरू असलेल्या वादात आपला काही संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, सांगलीच्या उमेदवारीवरून सर्वांचा रोख माझ्यावर होता. मात्र, माझा काहीही संबंध नाही. ते पुढे म्हणाले की, हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा विषय आहे. उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आल्यास पुन्हा माघार नसते, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकास एक निवडणूक झाल्यास आजच निकाल लागला असे समजा, असे जयंत पाटील म्हणाले.


संजय राऊत ज्या भागात जातात, त्या भागातील विरोधकांना आदल्या रात्री झोप लागत नाही. चंद्रावर पाटील नवखा चेहरा आहे, पण चंद्रहारला राजकीय पार्श्वभूमी नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत ज्येष्ठ नेत्याला हरवून चंद्रहार विजयी झाला, ही त्याची सुरुवात होती असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की सांगलीची खासियत म्हणजे हिंदकेसरी मारुती माने, पैलवान संभाजी पवार यांचं काम सांगलीने बघितला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील जत तालुक्यात दुष्काळी भागामध्ये सहा टीएमसी पाणी देण्यास निर्णय घेतला. या योजनेचं काम सुरू असून आता पाणी पोहोचेल आणि जत भाग बागायत होईल असे जयंत पाटील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या