सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक चर्चा सांगली लोकसभेची झाली होती. या लोकसभेला ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष लढताना विजयश्री सुद्धा खेचून आणली. विशाल पाटील यांच्या विजयामागे त्यांचे पायलट आमदार विश्वजित कदम यांचाच हात असल्याची चर्चा रंगली. दरम्यान, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी विजय प्राप्त झाल्यानंतर एकत्रित एबीपी माझाशी बोलतान प्रतिक्रिया दिली.
विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काम करण्याचं ठरवलं
निर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाचे कौतुक करतानाच मावळते खासदार संजय पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, दोन टर्म मिळून देखील मागचे खासदार जिल्ह्याच्या संपूर्ण विकासात अपयशी ठरले आहेत. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काम करण्याचं ठरवलं आणि खासदारकीचं स्वप्न पूर्ण झाल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, निवडणूक हाताबाहेर गेली होती आणि लोक ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे आम्ही आमची अपक्ष उमेदवारी ठेवली होती. त्यामुळे वसंतदादानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याचे नेतृत्व आणि राज्याचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
पक्ष नेतृत्वात माझ्याबद्दल गैरसमज करण्याचा प्रयत्न
दरम्यान, यावेळी बोलताना विश्वजित कदम यांनी सुद्धा निवडणूक निकालावर भाष्य केलं. विशाल पाटील यांना तिकीट मागत असताना खूप त्रास झाल्याचे कदम यांनी सांगितले. पक्ष नेतृत्वात माझ्याबद्दल गैरसमज व्हावे, असा सुद्धा अनेकांनी प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा कदम यांनी केला. विशाल पाटील यांनी मला पायलट म्हटले म्हणून अजिबात दडपण आलं नसल्यासही ते म्हणाले. कारण ज्या विमानात आम्ही बसलो होतो ते विमान वसंतदादांच्या आणि पतंगराव कदम यांच्या विचारांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान ते पुढे म्हणाले की, विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आमदार आहेत पण ते काँग्रेसचे खासदार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे एकूण 14 खासदार झाले असून एकूण आघाडीत 100 वे विशाल खासदार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर विश्वजीत कदम यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस ताकतीने उतरेल, असा आशावाद व्यक्त केला. विधानसभेमध्ये सहा ते सात आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान विशाल पाटलांना नाईलाजाने अपक्ष लढावं लागले, त्यांना मी राज्यसभेची ऑफर केली होती. विशाल पाटील यांना वाऱ्यावर सोडत नसल्याचेही विशेष कदम यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या