सांगली: उसाच्या शेताचं नुकसान करत असल्याने एका माकडाला ठार करण्यात आल्याचा प्रकार सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिऊर येथे घडला आहे. मात्र शेतीचे नुकसान करणाऱ्या माकडाला ठार करणे तरुणाला आता चांगलेच महागात पडले आहे. माकडाला ठार केल्या प्रकरणी त्या तरुणाच्या विरोधात वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.


शिराळा तालुक्यातल्या बिऊर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांच्याकडून ऊस शेतीचं नुकसान होत असल्याने एका तरुणाने शेतीचे नुकसान करणाऱ्या माकडाला एयरगन बंदुकीने गोळी घालून ठार केले आहे. मात्र हा प्रकार संबंधित तरुणाच्या चांगलाचं अंगलट आला आहे. माकडाला ठार केल्याप्रकरणी  संशयित अमित माने याच्या विरोधात वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वन्यजीव संरक्षण अधिनियमन कायद्यांतर्गत मानेच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित माने हा फरार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. एका माकडाला मारल्याची बातमी शिराळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून मिळाली. त्यानंतर वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक हणमंत पाटील, वनरक्षक विशाल दुबल, संपत देसाई यांनी घटनास्थळी भेट घेतली. 


यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिथुन गुरव यांनी  मयत माकडाचे शवविच्छेदन केले. पंचनामा करून त्याचा अंत्यविधी करण्यात आला. माकडांमुळे ऊस क्षेत्राचे नुकसान होत आहे, म्हणून एअर गनने माकडाला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर संशयित अमित माने पळून गेला आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून वनविभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.