Sangli Crime : सांगलीमधील कवठेमहांकाळ पोलिस आणि सांगलीच्या (Sangli News) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (Sangli Police) नागज फाट्यावर तब्बल 1 कोटी 17 लाखांचा गुटखा पकडला. पोलिसांनी यावेळी दोन कंटेनरसह सुगंधी तंबाखू आणि सुपारी असा एकूण एक कोटी 37 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी दत्तात्रय कोळी यांच्या समक्ष गुटख्याचा पंचनामा करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांना खबऱ्या मार्फत या मार्गावरून गुटख्याचा कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, यांच्यासह सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पोलिस पथकाने सापळा रचला. विजापूर येथून जतमार्गे या महामार्गावर दोन कंटेनर जात असताना सापळा रचलेल्या पथकातील सर्वांनी कंटेनर अडवले. पोलिसी खाक्या दाखवताच यामध्ये एका कंपनीचा गुटखा आहे तो पुण्याकडे वाहतूक करत असल्याचे संशयित आरोपींनी सांगितले.
कंटेनरसह तिघेजण ताब्यात
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागज फाट्यावर कर्नाटकातील अथणी सातारा मार्गे पुण्याकडे गुटख्याचे दोन कंटेनर जात होते. हे कंटेनर नागज फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला. कंटेनर फाट्यावर आल्यानंतर त्या दोन कंटेनरची अडवून पाहणी करण्यात आली. तेव्हा दोन्ही वाहनांमध्ये गुटखा असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही कंटेनरसह तिघांना ताब्यात घेतले. कंटेनरमधील तिपुरय्या संगप्पा बमनोळी, बसवेश्वर टोपण्णा कटीमणी (दोघेही रा. करजगी, ता. जत) श्रीशैल्य तमराया हाळके (रा. उमदी, सुसलाद रस्ता ता. जत) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कवठेमहांकाळ पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
ही कारवाई राज्यातील एक मोठी कारवाई असून कवठेमहांकाळ पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले. कवठेमहांकाळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक प्रशांत जितेंद्र जाधव, संजय पाटील, दीपक गायकवाड, नागेश खरात, संदीप नलावडे, विनायक सुतार, ऋतुराज होळकर आदींनी कारवाई केली.
मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा तडाखा लावला आहे. अनेक ठिकाणांवर कारवाई केली.अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या