सांगली : देशभरात आज विजयी दशमी दसऱ्याची (Vijaya Dashmi Dasara) धामधूम सुरु आहे. मुंबईत दसरा मेळाव्यासाठी (Mumbai Dasara Melava) ठाकरे आणि शिंदे गटाचे जोरदार तयारी झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava) यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात (Shivaji Park) अर्थात शिवतीर्थवर तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde Dasara Melava)) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात (Azad Maidan) होणार आहे. एकीकडे दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, तिकडे सांगलीच्या शिवसैनिकांचा मोठा अपघात झाला. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळी ही घटना घडली.  


एक भरधाव ट्रकने शिवसैनिकांच्या गाडीला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत.  शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने आझाद मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी भव्य दिव्य व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानात शेवटच्या शिवसैनिकाला एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकता यावेत यासाठी सहा मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. या मैदानाच्या आजूबाजूला येणाऱ्या शिवसैनिकांसाठी पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो शिवसैनिक एका वेळी बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असून व्हीआयपीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. 


शिंदे गटाच्या शिवसैनिकांची नवी मुंबईत चहा नाश्त्याची व्यवस्था


राज्यभरातून शिंदे गटाचे शिवसैनिक रात्रभर प्रवास करून नवी मुंबईत दाखल झाले आहेत. नवी मुंबईत या शिवसैनिकांसाठी चहा नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. शिवसेनेची ओळख असलेली मराठवाड्यातील भाकरी आणि चटणीची शिदोरी अनेक शिवसैनिकांनी घरूनच आणली आहे. याठिकाणी ते सकाळचा नाश्ता करत आहेत. शाळूची भाकरी आणि चटणीची शिदोरी ही खऱ्या शिवसैनिकांची ओळख असून अनेक वर्षांपासून आम्ही घरची शिदोरी घेऊन दसरा मेळाव्याला येतो अशी भावना ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी बोलून दाखवली.


पोलिसांची कडेकोट सुरक्षा


दसरा सण आणि त्यात मुंबईमध्ये होणारे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे यात मुंबईची कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झाले आहेत. आज मुंबईत दसरा मेळाव्यासाठी तब्बल 6 अतिरिक्त आयुक्त, 16 डीसीपी, 46 एसीपी, 2493पोलीस निरीक्षक, 12449 पोलीस शिपाईंसह 33 एसआरपीएफ क्यूआरटी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 


उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा
 शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्कत होत आहे.यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसैनिक इथे दाखल होत आहेत. हवेली तालुक्यातून मोहन यादव आणि त्यांचा मुलगा उद्भव यादव अनोखा रथ घेऊन आले आहेत. गेली सत्तावीस वर्ष बाळासाहेबांचे आणि उद्भव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा छायाचित्रांचा रथ घेऊन शिवसेनेच्या विविध सभांना हे पिता पुत्र हा रथ घेऊन येत असतात.