Sambhaji Bhide : सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी नवरात्रीतील (Navratri 2025) दांडिया (Dandiya) खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी भारतातील लोकांना निर्लज्ज असे संबोधून भारतीय संविधानावरही टीका केली आहे.
संभाजी भिडे म्हणाले, “आपल्याला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको, तर हिंदवी स्वराज्य हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती. त्याच प्रेरणेने आम्ही दुर्गामाता दौड घेतो. आपण गणपती व नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचे विकृतीकरण केले आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
'त्या' लोकांचा हा निर्लज्ज देश
संविधानाविषयी बोलताना भिडे यांनी तीव्र शब्दांचा वापर केला. ते म्हणाले, “आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात लिहिलंय. आणि लोक ते वाचतातही पोटात मुरड आल्यासारखे. काय संविधान, कसले संविधान? भारत हा 1300 वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची, गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे," असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
संभाजी भिडे यांचे याआधीही वादग्रस्त वक्तव्य
संभाजी भिडे यांनी याआधी देखील वादग्रस्त विधाने केली आहेत. सर्वधर्म समभाव हा ना धड स्त्री ना धड पुरुष असल्याचे विधान त्यांनी केले होते. सर्वधर्म समभाव हा ना धड स्त्री ना धड पुरुष असा प्रकार आहे. म्हणजे निव्वळ नपुंसकपणा. मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे, पण ते शक्य आहे का? तर नाही. म्हणून सर्वधर्म समभाव हा निचपणा आहे, असे ते म्हणाले होते. तसेच संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्यामुळे मूल जन्माला येत असल्याचाही अजब दावा केला होता. आबे खाऊन मूल होतात असे मी एकदा म्हणालो होतो. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे. मी एक आंब्याचे झाड लावले आहे. तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. याविषयी माझा एक कोर्टात खटला सुरू आहे, असे ते म्हणाले होते.
आणखी वाचा