पालघर : पालघरचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड येथे झालेल्या जनता दरबारात भाषण करताना प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. विशेष म्हणजे नाईक यांनी आपल्या सरकारलाच घरचा अहेर दिला आहे. "आज मंत्र्यांचेही हात बरबटलेले असतात. जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी अनेक ठिकाणी केवळ दिखावा केला जातो. लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही, ही खंत आहे.", अशा शब्दात मंत्री महोदयांनी आपल्याच सरकारमधील नेत्यांना घरचा अहेर दिला आहे. राज्यात एकीकडे पूरग्रस्तांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध जिल्ह्याचे पालकमंत्री पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मंत्री नाईक यांनी केलेल्या 'दिखावा' या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात गेल्या 8 दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पीकं आणि फळबागा पाण्यात वाहून गेल्या आहेत. शेतातली मातीही वाहून गेली कित्येक गावात पाणीच पाणी अशी पूरस्थिती आहे. त्यामुळे, कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी धीर देण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पालकमंत्री सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांना धीर देत सांत्वन करत आहेत, प्रशासनाला सूचनाही दिल्या जात आहेत. दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे.
नागरिकांच्या तक्रारी व अडचणींना प्रतिसाद देताना गणेश नाईक म्हणाले की, "आज मंत्र्यांचेही हात बरबटलेले असतात. जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी अनेक ठिकाणी केवळ दिखावा केला जातो. लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही, ही खंत आहे." नाईक यांच्या या वक्तव्यानंतर जनता दरबारात उपस्थित नागरिकांनीही टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला चांगलाच प्रतिसाद दिला. नाईक यांनी वनमंत्री म्हणून तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले.
मंत्री, आमदार नालायक असेल तर त्याच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायला पाहिजेत, असं गणेश नाईक म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्र्यांचे हात बरबरटलेले असतील तर ते ते बाहेर काढायचं की नाही असा सवाल उपस्थितांना गणेश नाईक यांनी विचारला.