Rohit R R patil on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी सांगली (Ajit Pawar in sangli) दौऱ्यावर आहेत. यावेळी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. रोहित आर. आर. पाटील यांनी यावेळी अजित पवार यांच्यावर जोरदार स्तुतीसुमने उधळली. बारामतीचा वाघ आलाय, आमच्यासाठी मुख्यमंत्रीच आहात, अशा शब्दात रोहित पाटलांनी अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला. उगवता सूर्य मावळायला आलाय अन् आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय, असे रोहित म्हणाले.
रोहित पाटील यांच्याकडून अजित पवार यांचे जोरदार स्वागत
दरम्यान, रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांचे जोरदार स्वागत केले. रोहित म्हणाले, "कुठलंही सरकार असले, तरी अजितदादा काम करू शकतात. अजितदादा तुम्ही महाराष्ट्रसाठी दादा असाल पण तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यासाठी तुम्ही आबा आहात.
कुणीही आडवे आले, तरी मी आबांचे स्वप्न पूर्ण करणार
यावेळी बोलताना रोहित यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "या मतदारसंघातील लोकांचे कौतुक करताना यांचं पाय धुवून पाणी पिलं, तरी यांचे उपकार फिटणार नाहीत. आबांना या लोकांनी खूप साथ दिली आहे. या मातीनं आमच्यावर उपकार केले आहेत ते आम्ही कधी विसरू शकणार नाही. आबांचा मुलगा म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे उपकार विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, दादा तुम्ही विरोधी पक्षनेता जरी असला, तरी आजही तुम्ही आमच्यासाठी मुख्यमंत्रीच आहात. कुठलेही सरकार असलं, तरी तुमच्याकडे काम दिलं की ते होतेच. दादा तुम्ही महाराष्ट्रासाठी दादा असाल, पण आमच्या तालुक्यासाठी तुम्ही आबाच आहात", असेही रोहित पाटील म्हणाले.
यावेळी, रोहित पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांनी नाव न घेता टीका केली. "विमानतळावरून दुटप्पी भूमिका विरोधक का घेतात? अशी विचारणा त्यांनी केली. आम्ही सुद्धा बांगड्या घातलेल्या नाहीत, आबांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला हात लागला, तर रोहित पाटील यांना हात लागला असे समजावे", असा इशारा त्यांनी दिला.
सरकारला सत्तेची मस्ती आली आहे
दरम्यान, राज्यातील सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचे पवार म्हणाले. अजित पवार तासगाव तालुक्यातील आरवडेत बोलत होते.
इतर महत्वाच्या बातम्या