सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) साखरसम्राटांशी दोन हात करून शेतकऱ्यांच्या पदरात फुल ना फुलाची पाकळी दिल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपला मोर्चा सांगलीमधील (Sangli News) ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे वळवला आहे. राजू शेट्टी यांनी कारखान्याच्या दारात खूर्चीवर बसून तंबू ठोकला आहे. 


सांगली जिल्ह्यातील ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. इस्लामपुरातील साखराळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मालकीच्या (Jayant Patil) राजारामबापू साखर कारखान्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या. या ठिकाणी साखर कारखान्याचा आतील ऊस काटा बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांकडून या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांचा दबाव झुगारून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या आत घुसून उसाचा गाळप बंद पाडण्यासाठी उसाच्या गव्हाणीत थेट उड्या देखील मारल्या. राजू शेट्टी कार्यकर्त्यांसोबत काटाबंद आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. 


कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली 


दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली आहे. राजारामबापू साखर कारखान्याकडून 3100 रुपये पहिली उचल आणि गत हंगामातील 50 रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, रिकव्हरी रेटप्रमाणे पहिली उचल 3200 रुपये देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतली आहे. 


आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून


दुसरीकडे राजू शेट्टी यांनी जयंत पाटलांवर कडाडून हल्ला चढवला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले आहे की,  विरोधी पक्ष म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा पक्ष झाला आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायच वाकून ही भूमिका जयंत पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्याच कारखान्यावर शेतकरी घामाच्या दामासाठी चिखलात बसला आहे. ज्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे पाप केले. त्यावेळी तुम्ही त्यांना पाठिंबा देत तोंड बंद करून बसलात. आज कारखाना सुरू होवून जवळपास एक महिना झाला तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न देण्यासाठी सत्ताधारी व विरोधी कारखानदारांना एकत्रित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नागवं करण्यात येत आहे. यामुळे ज्यांना स्वत:च्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नसेल त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय हक्काची लढाई शिकवू नये.


राजू शेट्टी म्हणाले की, सरकारच्या डोक्यात राजकारण आहे. जाहिरातबाजी करणे या पलीकडे काहीच करत नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत याबाबत कोणीच काही बोलत नाही. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब,  कापूस या भांडवली गुंतवणूक असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे, असे असताना सरकार हातपाय हलवायला तयार नाही. दोन-चार हजार रुपये देणार असतील तर शेतकरी उभा राहणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या