Rahul Gandhi In Sangli : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते 5 सप्टेंबर रोजी कडेगावरमध्ये स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आ. डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
स्व. पतंगराव कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी शिक्षक दिनाचा मुहुर्त साधण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष खा. शरद पवार, उबाठा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आदी मान्यवरांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
निवडणुक प्रचाराचे रणशिंग कडेगावमध्ये फुंकलं जाणार
यावेळी स्व. पतंगराव कदम यांचे मूळ गाव असलेल्या सोनसळ येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून यानंतर कडेगावमधील बयाबाई कदम महाविद्यालयाच्या पटांगणात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सुमारे दोन ते अडीच लाख लोक उपस्थित राहतील असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असल्याने या निमित्ताने निवडणुक प्रचाराचे रणशिंग कडेगावमध्ये फुंकले जात असल्याचे मानले जात आहे.
विश्वजित कदमांचा महायुतीवर हल्लाबोल
दरम्यान, बहुमत नसतानाही असंवैधानिक सरकार बनविण्यासाठी शिवसेनेतून फुटून 40 आमदारांनी मदत केल्याप्रकरणी त्यांचीच महायुती सरकारला जास्त चिंता आहे. म्हणून ते राज्यातील महिला व मुलींना संरक्षण देण्यात कमी पडत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केला आहे.
कदम म्हणाले, बदलापूर येथील घटनेबाबत सरकारने तत्काळ काही उपाययोजना करण्याची गरज होती. पण, या सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. महिलांच्या हितासाठी हे सरकार आहे, असा ढोल सत्ताधारी वाजवत आहेत. पण राज्यातील महिला आणि मुलींच्यावर अन्याय होताना, ते थांबविण्यासाठी काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. बदलापूर येथील ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या प्रशासनात कोण आहे. त्यांना वाचवण्यासाठीच सत्ताधारी प्रयत्नशील होते. त्यामुळेच जनता त्यांच्यावर चिडून आहे. दिवसेंदिवस अशा घटना घडत आहेत. पण सरकार शासकीय कार्यक्रम करण्यात मश्गूल आहे.
इतर महत्वाच्या बातम्या