Sangli News : सांगलीत पतसंस्थेत लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी जात असताना हिसडा मारून तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. आधी जवळपास 40 तोळे सोने चोरीला गेले असल्याची प्राथमिक माहिती होती. नंतर सांगली पोलिसांनी तपास केल्यानंतर आणि संबंधित व्यक्तीने नेमके किती सोने कुटुंबानी बॅगेत दिले होते याची चौकशी केली असता चोरीला 13 तोळे सोने गेल्याचे समोर आले. याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवून स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांनी चार तासात चोरीचा छडा लावून चोरीस गेलेले 13 तोळे सोने जप्त केले.

मित्र अमोल मानेच्या मदतीने सोने चोरीचा प्लॅन आखला

सांगलीतील व्यापारी ध्यानचंद्र सकळे यांच्या घरी लग्न कार्य असल्याने त्यांनी 29 एप्रिल रोजी कर्मवीर भाउराव पाटील पतसंस्थेमधील लॉकरमधून सोने काढले होते. लग्न कार्य आटोपल्यानंतर शुक्रवारी सकाळी (2 मे) ते लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी एका पिशवीतून सोने आणले होते. पतसंस्थेमध्ये लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी ध्यानचंद्र सकळे हे एकटेच असल्याची माहिती त्यांचा ड्रायव्हर नितेश गजगेश्वरला माहिती होती. याबाबत त्याने मित्र अमोल मानेच्या मदतीने सोने चोरीचा प्लॅन आखला होता. 

हातातील सोन्याच्या पिशवीला हिसडा मारून पोबारा केला

पतसंस्थेसमोर ध्यानचंद्र सकळे हे कारमधून उतरताच ड्रायव्हर नितेश गजगेश्वर याने तातडीने कार पुढे घेतली. यानंतर त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या अमोल मानेनं सकळे यांच्या हातातील सोन्याच्या पिशवीला हिसडा मारून पोबारा केला होता. यानंतर अमोल माने एका टेम्पोमध्ये सोने ठेवून पसार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून चार तासात या चोरीचा छडा लावला. यावेळी ड्रायव्हरसह दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान यातील अमोल माने हा चोरटा लोहमार्ग पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या