सांगली : उन्हाळ्याची सुट्टी आणि गावच्या यात्रेच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यासाठी असणाऱ्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हर्ष अतुल सुखदेव (वय 15) आणि आदित्य अतुल सुखदेव (वय 13) अशी त्यांची नावे आहेत. ही भावंडे काही दिवसांपूर्वी तासगावजवळ नेहरूनगर या मूळ गावी सुट्टीसाठी आली होती. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडून या दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. 


दोन्ही मुलांच्या आकस्मिक मृत्यूने सुखदेव कुटुंबावर शोककळा


याबाबत अधिक माहिती अशी, हर्ष आणि अतुल ही दोन्ही भावंडे त्यांच्या आई-वडिलांसमवेत मुंबईत स्थायिक आहेत. त्यांचे मूळ गाव नेहरूनगर असून गावाकडे आजी-आजोबा असतात. काही दिवसांपूर्वी उन्हाळ्याची सुट्टी आणि गावच्या यात्रेच्या निमित्ताने दोन्ही भावंडे गावाकडे राहण्यासाठी आली होती. शनिवारी दुपारी दोन वाजता दोघेही घराबाहेर पडली होती. पाच वाजले तरी दोघेही परत आले नाहीत. आजूबाजूला शोध घेतल्यानंतर काही अंतरावर असलेल्या शेततळ्यात दोघेही बुडल्याचे लक्षात आले. 


दोघांचाही शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर याबाबतची माहिती पोलीस पाटील अमोल वाघमारे यांनी तासगाव पोलीस ठाण्याला कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार रवींद्र रांजणे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत. 


मुलांचे वडील अतुल सुखदेव हे नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांना हर्ष आणि आदित्य ही दोन मुले आहेत. हर्ष दहावीत, तर आदित्य सातवीत मुंबई येथे शिकत होता. दोन्ही मुलांच्या आकस्मिक मृत्यूने सुखदेव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या