Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) मिरज तालुक्यात सोनीमध्ये सोमवारी मध्यरात्री एका पैलवान तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून करण्यात आला. काही पैलवानांकडूनच हा खून करण्यात आला आहे. आकाश माणिक नरुटे (वय 22) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

  


सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक (Sangli District Gram Panchayat Election) सुरू असून प्रचार देखील सुरू आहे. याच काळात पूर्ववैमनस्यातून खुनाच्या या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. आकाशला दोघांनी बोलावून दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाशचा मोबाइल बंद असल्याने शोधाशोध केली. यानंतर रात्री 12 वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आकाशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. आकाशच्या डोक्यात व पाठीवर धारदार हत्याराने अनेक वार केले होते.  


भावासोबत शेती करणारा आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसापूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.


मिरजेत रिक्षाचालकावर चाकूहल्ला; गुन्हा दाखल 


दरम्यान, मिरजेतील (Sangli Crime) शासकीय रुग्णालयाजवळ रिक्षा जवळून नेल्याच्या कारणातून रिक्षाचालक अनिकेत अरुण सूर्यवंशी (वय 23, रा. आंबेडकर नगर, मिरज) याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यानंतर रमेश बिशूशर्मा आणि रोशन बिरसांगे जनाला (रा. मिरज) या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत सूर्यवंशी मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या गेटजवळून चालले होते. यावेळी तिथं थांबलेल्या रमेश बिशुशर्मा जवळून रिक्षा नेली. याचा राग आल्याने रमेश व रोशन यांनी अनिकेतला अडवून जाब विचारला. यावेळी शिवीगाळ करून चाकूने वार केल्याने अरुण सूर्यवंशी जखमी झाले. 


मैत्रिणीशी बोलला म्हणून मारहाण 


दुसरीकडे सांगलीत (Sangli Crime) मैत्रिणीशी बोलला म्हणून संतापलेल्या मित्राने तरुणास काठीने बेदम मारहाण केल्याची घटना माधवनगर रोडवर घडली. या मारहाणीत आकाश तुकाराम मोहिते (वय 21, रा. विनायकनगर, सांगली) हा तरुण जखमी झाला. त्याने संजयनगर पोलिस ठाण्यात  फिर्याद दिल्यानंतर  राहुल तुकाराम दुधाळ आणि रोहित तुकाराम दुधाळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी ही घटना घडली.


इतर महत्वाच्या बातम्या