Sangli Mass Suicide : सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिकानगरमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना कशी घडली? याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेहांचे पंचनामे केले जात आहेत. ही सामूहिक आत्महत्या आहे की अन्य कारणे आहेत याचाही तपास सुरू आहे.


मात्र, प्राथमिक माहितीनुसार सांगलीतील मिरज परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळच्या अंबिकानगर भागातील एका घरात या सर्व 9 जणांचे मृतदेह सापडले. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन सख्ख्या भावांच्या संपूर्ण कुटुंबातील हे सर्व मृतदेह आहेत. सांगली पोलीस घटनास्थळी हजर आहेत. आतापर्यंतच्या तपासात कोणाच्याही अंगावर जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही भावांच्या कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या केली असावी. 


अद्याप घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे एसपी आणि आयजीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण केले आहे. सर्व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यासोबतच आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.


कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा संशय


सध्या या सर्व मृतदेहांसोबत कोणतीही सुसाईड नोट न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन या दोन भावांच्या कुटुंबीयांनी ही सामुहिक आत्महत्या केली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. एका खोलीत तीन मृतदेह तर दुसऱ्या खोलीत 6 मृतदेह सापडले.
 
आत्महत्या केलेल्यांची नावे 



  • पोपट यल्लापा वनमोरे (52)

  • संगीता पोपट वनमोरे (48)

  • अर्चना पोपट वनमोरे (30)

  • शुभम पोपट वनमोरे (28)

  • माणिक यल्लापा वनमोरे (49)

  • रेखा माणिक वनमोरे  (45)

  • अनीता माणिक वनमोरे (28)

  • आदित्य माणिक वनमोरे (15)

  • अक्काताई वनमोरे(72)


इतर महत्त्वाच्या बातम्या