सांगली : जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात तासगावमधील रिंग रोडच्या श्रेवादावरून खासदार विशाल पाटील व संजय काका पाटील यांच्यात (MP Vishal Patil Vs Sanjay Patil) जोरदार वादावादी झाली. माजी खासदार संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत कडक शब्दात टीका केली. तासगाव रिंगरोडचे श्रेय विशाल पाटील यांनी रोहित पाटील यांना दिल्याने संजय काकांनी माईक वरून खासदारांना सुनावले. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोरच ही वादावादी झाली. आमदार सुमनताई पाटील यावेळी उपस्थित होत्या. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ झाला. हा वाद वैयक्तिक होता आणि तो आता मिटला असल्याचे सांगत राजकीय स्टंटबाजी न करता सगळ्यांनी मिळून मिसळून राहण्याचे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही
दरम्यान, या वादानंतर युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. ते म्हणाले की, तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही. वैफल्यग्रस्त लोक असे वागतात. संजय पाटील यांचे कार्यकर्ते व्यासपीठाकडे शिव्या देत आले.श्रेयवादासाठी गोंधळ घातला गेला. त्यांनी सांगितले की, आमदार सुमनताई पाटील, खासदार विशाल पाटील बसलेल्या व्यासपीठाकडे संजय पाटील यांचे कार्यकर्ते धावून गेले. श्रेयवादासाठी काही मंडळींनी गोंधळ घातला. वैफल्यग्रस्त लोकांकडून असे प्रकार होत असतात. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, हे येत्या काळात आम्ही दाखवून देऊ.
वाद नेमका कशामुळे झाला?
विशाल पाटील यांनी तासगाव रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळण्याचे श्रेय रोहित पाटील यांना दिले. त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना विशाल पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. विशाल तुम्ही काल खासदार झालाअसे म्हणत टीकास्त्र सोडले. यानंतर वादाला तोंड फुटले. विशाल पाटील यांनी उभे राहून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर संजय पाटील यांनी ये बस खाली म्हणत एकेरी उल्लेख केला. दुसरीकडे, गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग रोडसाठी 173 कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती. या रिंगरोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये केला. त्यामुळे तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकत्यांनी या निर्णयाबद्दल फटाके वाजवून जल्लोष करत शहरात बॅनर लावले होते.
इतर महत्वाच्या बातम्या