Sangli Bandh : सांगली शहरात महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ सर्व पुरोगामी संघटनांकडून सांगली शहर बंदची (Sangli Bandh) हाक देण्यात आली होती. या बंदला सांगली शहररात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सनदशीर मार्गाने सर्व पुरोगामी संघटनाकडून निषेध व्यक्त केला गेला.


सुरुवातीला स्टेशन चौकात एकत्र येऊन पुरोगामी संघटनाच्या सदस्यांनी राजवाडा चौक, हरभट रोड, मारुती चौक मार्गे पदयात्रा काढत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पदयात्राचा शेवट केला. यावेळी छत्रपतीच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि वंदन करून पुरोगामी संघटनाच्या सदस्यांनी पुतळ्यासमोर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. यानंतर सर्व सदस्यांची भाषणे झाली आणि या पदयात्राचा शेवट केला गेला. सर्व पुरोगामी संघटना, शिवप्रेमी, बाबासाहेब आंबडेकर प्रेमी, ठाकरे गट, राष्ट्रवादीचे काही स्थानिक नेते देखील या मोर्चात सहभागी झाले. (Sangli Bandh)


यावेळी शहरातील बाबासाहेब आंबडेकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अन्य महापुरुषांच्या पुतळ्याला देखील अभिवादन केले गेले. महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ याआधी 17 डिसेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्या विरोधात आणि निषेधार्थ ठिय्या आंदोलन केले होते. आता या निषेध आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून महापुरुषांच्या सन्मानार्थ अत्यावश्यक सेवा वगळून सांगली बंद ठेवण्याचा सर्व पुरोगामी संघटनानी निर्णय घेतला होता. ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. 


बहूजन समाजातील महामानवांची बदनामी करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे धोरण महाराष्ट्रातील भाजप व संलग्न जातीय संघटनांनी गेल्या महिन्यापेक्षा जास्त काळ आणि त्या अगोदर ही हेतुपरस्सर अवलंबलेले आहे. त्यामुळे बहूजन समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला असून या घटनांचा व जातीयवादी विकृत मानसिकतेचा राज्यभर निषेध व्यक्त केला जात असल्याच्या भावना यावेळी सर्व पुरोगामी संघटनाच्या सदस्यांनी व्यक्त केल्या.


राज्यपालांकडून बेताल वक्तव्ये, चंद्रकांत पाटलांकडूनही अपशब्द


राज्यात गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्यांची मालिकाच सुरु आहे. त्यामुळे त्याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटत आहेत. राज्यपालांना हटवण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत विरोध होत आहे. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई आजवर झालेली नाही. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यानंतर त्यांनी दोनवेळा जाहीर माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही शिवरायांच्या जन्मस्थळावरून बेताल वक्तव्ये केलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या