सांगली: राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका होऊन देखील अद्याप नेत्यांचं पक्षातंर होताना दिसत आहे, काही दिवसांपुर्वी काँग्रेस नेते आणि पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला, त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजप मध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
राजकारणामध्ये वर्तमानावर चालायचं असतं, वर्तमानामध्ये खासदार विशाल पाटील यांच्या हाती अजून चार वर्ष दोन महिने बाकी आहेत, त्यामुळे त्यांच्या या शिल्लक राहिलेल्या कालावधीचा आम्ही विचार करतो, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं पुढे काय होईल माहित नाही, वर्तमान काळात त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत. या कालावधीचा आम्ही विचार करतो. जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली संख्या देखील वाढते, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील विकासाच्या कामाला त्यांना जे काय करायचं आहे. त्याला देखील सोपं जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करावा, असंही पुढे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ऑफरवर काय म्हणाले विशाल पाटील?
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय, ही चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल. मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असे मी समजतो, पण भाजपप्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नाही. मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही. सर्व लोकप्रतिनिधीनी पक्ष गट तट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करतोय हे माझं धोरण आहे, अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीची जागा लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष लढून जिंकली आहे. या मतदार संघातून उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना तिकीट आधीच जाहीर केलं होतं. कॉंग्रेसचे विशाल पाटील या मतदार संघात लढायची तयारी करीत दोन वर्षांपासून करत होते. भाजपाच्या संजय काका पाटील यांचा पराभव करून ठाकरे गटाला धक्का देत विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली होती. विशाल प्रकाशबापू पाटील अपक्ष म्हणून 5 लाख 71 हजार 666 मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे संजयकाका पाटील यांना 4,71 हजार 613 मते मिळाली होती. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार सुभाष पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना 60, 860 मते मिळाली होती.