सांगली : कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) रद्द करण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या मनोज जरांगे यांनी एक मोठी शंका व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहे, त्या आता रद्द केल्या जात आहेत. त्यातून एकनाथ शिंदे यांची मराठ्यांमध्ये निर्माण झालेली क्रेझ कमी करण्याचा डाव असू शकतो, अशी शंका जरांगे यांन व्यक्त केली आहे. मनोज जरांगे हे राज्यव्यापी दौऱ्यावर असून सांगलीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

Continues below advertisement

मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात जुन्या वंशावळी शोधून कुणबी प्रमाणपत्रं देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पण गेल्या काही दिवसात काही मराठा उमेदवारांची प्रमाणपत्र अवैध ठरल्याचं समोर आल्यावर मनोज जरांगेंचा चांगलाच पारा चढला. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करत ढबल ढोलकी असल्याचा आरोप केला. शिंदे यांच्या मान्यतेनंतर त्यांचे मंत्री संजय शिरसाट यांच्या आदेशाने कुणबी प्रमाणपत्र रद्द केली जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. त्यानंतर आता जरांगे यांनी आपल्या टीकेचा सूर बदलत नवी शंका व्यक्त केली. 

Manoj Jarange On Eknath Shinde : 'शिंदेंची क्रेझ कमी करण्याचा डाव'

मनोज जरागे म्हणाले की, "मराठा समाजाला पक्क टिकणारं आरक्षण हवं आहे. त्यासाठी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली पाहिजेत. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्या. एकनाथ शिंदे यांच्या काळात या 58 लाख नोंदी सापडल्या. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बावनकुळेंना काही वेगळं वाटत असेल. या नोंदी रद्द केल्या तर मराठ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची क्रेझ निर्माण झाली आहे ती मिटेल, असा प्लॅन असण्याचा डाव असू शकतो."

Continues below advertisement

एकनाथ शिंदे यांच्या काळात ज्या नोंदी सापडल्या त्या अशाच सापडल्या नाहीत. त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. एकनाथ शिंदे यांनी शिंदे समिती गठीत केली आणि त्या माध्यमातून या नोंदी शोधल्या. आता त्या नोंदी रद्द करण्याचं काम बावनकुळेसारखी माणसं करत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. 

मराठ्यांना दिलेलं पक्क आरक्षण हे टिकू देत नाहीत. 100-200 वर्षांपूर्वीच्या नोंदी मिळाल्या तरी ते प्रमाणपत्र रद्द केली जात आहेत. मग हे 10 टक्के आरक्षण तरी ठेवतील का अशी शंका आहे, असंही जरांगे म्हणाले. 

Manoj Jarange On Chandrashekhar Bawankule : जरांगेंचा राज्यव्यापी दौरा

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनताना दिसत आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या वादावरून सरकारवर हल्लाबोल करणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रापासून सुरू होणारा हा दौरा विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत जाणार असून, त्याची सांगता 29 ऑगस्टच्या निर्णायक आंदोलनात होणार आहे. त्यामुळे हा केवळ जनसंवादाचा दौरा नसून, मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा एकवटण्याची राजकीय मोर्चेबांधणी मानली जात आहे. 

दुसरीकडे, ओबीसी संघटनाही अधिक आक्रमक होत असल्याची चिन्हं आहेत. अशा परिस्थितीत सरकारसमोर मराठा आणि ओबीसी या दोन्ही प्रभावी समाजघटकांमध्ये समतोल राखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं असून, येत्या काही आठवड्यांत महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.