सांगली: काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसात चांगले दिवस येतील. ज्याप्रमाणे एखाद्या वाघाला कोपऱ्यात ढकलले, तर तो चवताळून उठतो तशाच पध्दतीने महाराष्ट्रमधील काँग्रेस पक्ष आज चवताळलेल्या वाघाच्या भूमिकेत आहे, लोकसभा निवडणुकीत तो भल्याभल्यांना गारद करेल, भाजपला याचा अंदाज नाही, असा आत्मविश्वास काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. विश्वजित कदम यांनी सांगलीत (Sangli News) बोलताना काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर भाष्य केले. कदम म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले वातावरण आहे. मित्रपक्षांसह केलेली महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपने राजकारणात, लोकशाहीत चुकीचा पायंडा पाडला आहे. दुसऱ्याचे पक्ष फोडून सत्तेचे राजकारण ते करताहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे सारे मनसुबे धुळीस मिळतील.
सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. एकसंधपणे आम्ही काम करणार आहोत, त्यामुळे पुन्हा बालेकिल्ला ताब्यात घेऊ. ही जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असेही विश्वजित कदम म्हणाले.
पुरवणी बजेटच्या माध्यमातून निधी वाटप करताना दुजाभाव करण्यात आला. विरोधकांच्या मतदारसंघासाठी निधी देण्यात आला नाही. त्यामुळे एक प्रकारे जनतेवरच हा अन्याय होत असून हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारा नाही, असेही विश्वजित कदम म्हणाले. कर्नाटक सीमेवरील गावातील लोक महाराष्ट्रात येण्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष करीत आहेत. आता महाराष्ट्रातील जत तालुक्यातील लोक हतबल होऊन कर्नाटकात जाण्याचा इशारा देत आहेत. ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. महाराष्ट्र सरकारला याबाबत काहीच कसे वाटत नाही, असा सवालही कदम यांनी यावेळी उपस्थित केला.
काँग्रेस कर्नाटक पॅटर्न राबवत आहे
दुसरीकडे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते. शनिवारी (12 ऑगस्ट) त्यांनी काँग्रेसच्या तयारीवर भाष्य केले. काँग्रेसकडून 24 टीम महाराष्ट्र राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. आता केवळ आम्ही मित्रपक्ष, विरोधात कोण आहे, आमची ताकद किती आहे याचा आढावा घेत असल्याचे चव्हाण म्हणाले. चव्हाण म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीची ताकद वाढत आहे. कर्नाटक पॅटर्न काँग्रेसने महाराष्ट्रात राबवला आहे. राज्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर मतदारसंघात काय भावना आहेत हे मी पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष फुटला असला तरी जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूनं आहे, नागरिक निवडणुकीची वाट पाहत आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या