Sangli News : आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस (ED Notice) पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी सोमवारी (15 मे) हजर राहण्याचे आदेश नोटीमधून देण्यात आले आहेत. मात्र जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावे या बाबतचे पत्र जयंत पाटील यांनी काल (11 मे) ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत वाढवून घेतली आहे. 


कंपनीसोबत माझा एक रुपयाचाही व्यवहार नाही : जयंत पाटील


दरम्यान जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना 'आयएल अँड एफएस' प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी 'कमिशन रक्कम' दिल्याचा आरोप ईडीने केला आहे आणि याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले जातील. मात्र या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या 'आयएल अँड एफएस' कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया काल माध्यमांना दिली होती.


लग्नाच्या वाढदिवशी हवालदार घरी आणि नोटीस देऊन गेला 


बुधवारी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी नोटीस मिळाली. त्यात काय उल्लेख आहे. मी नीट वाचला नाही. नोटीस मुंबईच्या घरात एका हवालदाराने आणून दिली आहे. माझ्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ आहेत. त्यामुळे त्यांनी तारीख दिली असली तरी मी उद्या हजर होऊ शकत नाही. मी वेळ मागून घेणार आहे. या प्रकरणात माझा काडीचा संबंध नाही. कारण, मी कथित कंपनीशी रुपयाचा व्यवहार केलेला नाही. मला कर्ज काढायला आवडत नाही. कर्ज काढावे, असं माझं धोरण नसतं. त्या कंपनीच्या दारात कधी गेलेलो नाही. मला नोटीसची चिंता नाही. मी कोणत्याही दबावाशिवाय काम करतो असे जयंत पाटील यांनी म्हटलं.


दरम्यान काल (11 मे) एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येणार असतानाच दुसरीकडे जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितल्याचं समोर आलं. सत्तासंघर्षाचा निकाल काही तासांवर आलेला असताना जयंत पाटील यांना ईडीची नोटीस मिळणं या योगायोगाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती.


VIDEO : Jayant Patil ED Notice: ईडी चौकशीसाठी मुदतवाढ मिळावी म्हणून जयंत पाटील यांचं ईडीला पत्र