Sangli Crime : कवठेमहांकाळ पोलिसांनी हस्तीदंत तस्करी करणारी टोळी गजाआड केली आहे. तब्बल 20 लाखांचे दोन हस्तीदंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रविरारी रात्री 11वाजता दंडोबा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. राहुल भीमराव रायकर (वय 26, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), बालाजी हरिचंद्र बनसोडे (वय 30, रा. विजयनगर, कोल्हापूर), कासीम शमशुद्दीन काझी (20, रा. खाजा वस्ती, मिरज), हणमंत लक्ष्मण वाघमोडे (39, रा. खोत वस्ती, पांडेगाव, ता. अथणी) या चौघा तस्करांना अटक करण्यात आली आहे. 


याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत बातमी मिळाली होती.त्यानुसार खरशिंग ते दंडोबा डोंगराकडे जाणाऱ्या रोडलगत गिरनार तपोवन मठाच्या येथे झाडाझुडपात हत्तीदंत घेऊन थांबलेले आढळून आले. कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचून या चार आरोपींना अटक केली. कोल्हापूर येथून हस्तीदंत घेऊन येणारे दोन आरोपी आणि सांगलीमधील खरेदीदार दोन आरोपी असे चार आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर वन्य जीव कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


सांगली पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकाने खरशिंग, दंडोबा परिसरात धाव घेतली. यावेळी गिरनार तपोवन शेजारी असलेल्या झुडपामध्ये काहीजण अंधारात संशयास्पद बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे ३८ व १९ सेंटीमीटर लांबीचे दोन हस्तीदंत मिळून आले. 


तपकिरी पांढऱ्या रंगाच्या, पुढील बाजूस टोकदार व भरीव असलेल्या या दोन्ही हस्तीदंतांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. याशिवाय चौघांनी आणलेल्या 4 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.


ही कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक निरीक्षक सागर गोडे, सहायक उपनिरीक्षक विजय घोलप, पोलीस नाईक अमिरशा फकीर, चंद्रसिंग साबळे, केरुबा चव्हाण, सिद्धेश्वर कुंभार यांनी केली.