Sangli News : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी सभापतीपदी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसने एकाकी लढत दिली. या चुरशीने झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांना 9 तर काँग्रेस उमेदवार संतोष पाटील यांना अवघी 5 मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनच काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. 


त्यामुळे सांगली महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करीत भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा विजय झाला. सभापतीपदी विजयी झाल्यानंतर धीरज सुर्यवंशी यांचा आमदार सुधीर गाडगीळ, माजी आम दिनकर पाटील, दिपकबाबा शिंदे, शेखर इनामदार आदीसह भाजपा नेत्यांनी सत्कार केला.


दरम्यान, स्थायी सभापती निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या त्या दोन राष्ट्रवादीच्या सदस्यांचा नेत्यांकडून शोध सुरू आहे. बुधवार दुपारपासून संपर्कात नसलेले राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य संगीता हारगे आणि पवित्रा केरीपाळे हे अचानक गेले कुठे याचा आम्ही शोध घेत असून झाल्या सर्व घटनांचा नेते जयंत पाटील यांच्याकडे अहवाल सादर करणार असून कारवाईबाबत नेतेच निर्णय घेतील अशी सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी दिली. 


तर राष्ट्रवादीने आपल्याला दिलेला शब्द पूर्ण केला नाही, तसेच आघाडी धर्माचे पालन केले नाही. दगाफटका केला असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्व सदस्य सभागृहात असते, तर नक्की आम्ही चमत्कार केला असता. मात्र, राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्याने आम्ही काहीच करू शकलो नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या