Sangli Crime : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरजेत कुत्र्यांनी पाच वर्षाच्या चिमुकलीचे लचके तोडल्याने नागरिक देखील आता या भटक्या कुत्र्याच्या विषयावर आक्रमक होताना दिसत आहेत. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नांसाठी प्राणीमित्र-नागरिक यांची आज तातडीची बैठक पार पडत आहे. 


मिरजेतील वेताळबानगर परिसरात राहणाऱ्या जुबेर जमादार यांच्या जैनबी या लहान मुलीचे भटक्या कुत्र्याने लचके तोडले. बालवाडीत शिकणारी जैनबी दुपारी दीडच्या दरम्यान शाळेतून परतल्यानंतर घरच्या गेटजवळ खेळत बसली असता सदरचा प्रकार घडला. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तिच्या मांडीवर हातावर पायावर तसेच मानेच्या बाजूला मोठ्या जखमा झाल्या होत्या. 


कुत्री तिला ओढत गेटमधून बाहेर घेवून जात असताना मुलीच्या आरडा ओरड्याने शेजारी तसेच मुलीचे वडील जुबेर जमादार हे बाहेर आले. त्यांनी काठी, दगड मारून कुत्र्यांना हुसकावून लावले. जैनबी हिला पाठीवर, मांडीवर, गुडख्यावर, हातावर कुत्र्यांनी चावा घेतला असून तिच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक वेळोवेळी करीत आहेत. मात्र मनपाकडून कारवाई केली जात नसल्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. 


मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नांसाठी प्राणीमित्र-नागरिक यांची बैठक


मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत उपाययोजनेचे स्वरुप ठरवण्यासाठी पालिका मुख्यालयात प्राणीमित्र संघटनांची बैठक होत आहे.  यापूर्वी झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा विषय लावून धरला होता. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. लहान मुले, नागरिकांना चावे घेण्याचे प्रकार घडले आहेत. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून यंत्रणा मात्र मुग गिळून गप्प आहेत. 


यंत्रणा आहे मात्र ठेका नाही अशी स्थिती


मानधनावर नियक्त केलेले पशुवैद्यकीय अधिकारी तक्रारींचा पाढा वाचतात. त्यांना महिन्याकाठी 4 हजार रुपये मानधन आहे, तर श्वानपथकाकडे दोन व्हॅन, चालक मुकादम असा सुमारे 15 जणांचा ताफा आहे. श्वानाची नसबंदी आता बंद आहे. नव्याने ठेका दिलेला नाही. यंत्रणा आहे मात्र ठेका नाही अशी स्थिती आहे. सध्या पथकाकडून रोज दोनच कुत्र्यांची नसबंदी होते. प्रत्यक्षात पालिका क्षेत्रात दहा हजारांवर कुत्री आहेत. यावर ठोस उपाययोजना गरजेची आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या