Gopichand Padalkar : आटपाडीत कथित ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी यांनी भोंदूपणाचा कळस केल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. शहरातील वरद हाॅस्पिटलमध्ये धर्मांतराच्या उद्देशाने घुसून त्यांनी केलेल्या भोंदूपणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडून संजय गेळेच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली. आटपाडीत बेकायेशीर धर्मांतर आणि चर्च बांधकाम झाल्याचेही पडळकर यांनी सभागृहात सांगितले.


पडळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस यांनी गेळे कुटुंबाच्या मार्फत होणारे धर्मांतर आणि चर्चच्या बांधकामाबाबत शासनामार्फत चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही दिली. तत्पूर्वी, लक्षवेधी मांडताना पडळकर म्हणाले की, आटपाडीत संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघे लोकांच्या अज्ञानाचा आणि भोळेपणाचा फायदा घेत आहेत. त्यांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आटपाडीत  बेकायदा चर्च बांधले आहे. धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि बेकायदा चर्चचे बांधकाम काढून टाकावे. गेळे कुटुंबियाकडे आलिशान हॉटेल, जेसीबी आणि पोकलँड मशीन आणि अनेक ठिकाणी जमिनी अशी संपत्ती आहे. ती कशी आली याची चौकशी करावी आणि कारवाई करावी. 


याबाबत लोकभावना अत्यंत तीव्र आहेत.कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देत शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी पडळकर यांनी केली. 


भोंदू संजयला पोलिस कोठडी 


दुसरीकडे, वरद हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील 18 वर्षीय मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन संजय आणि अश्विनी गेळे या दोघांनी प्रार्थना म्हणल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जादूटोणा आणि भोंदूगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी संजय गेळेला पोलिसांनी उचलले असून 31 डिसेंबरपर्यंत त्याला न्यायालयाकडून पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


आटपाडीमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा


संजय गेळेच्या आतापर्यंतच्या या सगळ्या कारभाराची, संपत्तीची चौकशी करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भाजप आमदार राम सातपूते मोर्चात सहभागी झाले. रविवारी गेळे दांपत्याला अटक करून कठोर कारवाई व्हावी यासाठी एक दिवस बंद ही पाळण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या