सांगली : धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी सैराट करेल त्याला 11 लाखांचे बक्षीस जाहीर करा असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं. धर्मांतरण करण्यासाठी ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गरोदर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षा करा असंही ते म्हणाले. धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणणाऱ्या ख्रिश्चन पादरीला सहआरोपी करावे यासाठी सांगलीत मशाल मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. 

सांगलीतील यशवंतनगर येथे धर्मांतरासाठी तगादा लावलेल्या सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवतीने आत्महत्या केली होती. त्यामुळे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, तसेच तिला धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणार्‍या पादरीवर गुन्हा दाखल करून त्याला देखील सहआरोपी करा अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी केली.

Gopichand Padalkar On Rutuja Rajge Case : पादरीचा सैराट करेल त्याला... 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीसं ठेवली जातात. त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीसं ठेवली पाहिजेत. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचे बक्षीस. दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखांचे, तर तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांचे बक्षीस. जो कुणी पादरीचा सैराट करेल त्याला 11 लाखांचे बक्षीस ठेवलं पाहिजे.

Rutuja Rajge Suicide Case : पोस्टरवरून भडकले पडळकर

मशाल मूक मोर्चासाठी सांगलीमध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स प्रशासनाने काढले. त्यावर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आम्ही कायदा मानणारे लोक आहोत. आमचे बोर्ड अनधिकृत वाटले म्हणून प्रशासनाने ते काढले. पण ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्या पद्धतीने त्यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व बेकायदेशील प्रार्थनास्थळांवर कारवाई केली पाहिजे. या सगळ्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांची यादी काढून त्यावर बुलडोझर फिरवला पाहिजे. त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांचा आपण जाहीर सत्कार करू. जर का अनधिकृत प्रार्थना स्थळे प्रशासनाने हटवली नाहीत तर हिंदुंशी गाठ असेल. 

ऋतुजा राजगेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून सांगलीतील यशवंत नगर येथील सात महिन्याच्या गरोदर महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेचा नवरा आणि सासू-सासरे यांच्या विरोधात सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऋतुजा सुकुमार राजगे असे या महिलेचे नाव असून ती उच्चशिक्षित होती. 

ऋतुजा आणि सुकुमार राजगे यांचा विवाह 2021 साली हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. मात्र विवाह झाल्यानंतर राजगे कुटुंबीयांकडून ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्यासाठी तगादा लावण्यात येत होता. ऋतुजाला धर्मांतर कर म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली. तसंच हिंदू पद्धतीने घरात कोणतीच पूजा करायची नाही, देवाला नमस्कार करायचा नाही, चर्चमध्ये जाऊन प्रार्थना अशी ताकीद सासू आणि सासरे यांनी दिली. 

लग्नामध्ये खूप कमी सोने घातले आहे त्यामुळे घराच्या बांधकामासाठी पैसे घेऊन ये अशी वारंवार मागणी केली. शेवटी हतबल झालेल्या ऋतुजा हिने आपल्या रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.