सांगली : माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. दोघांनी मिळून एकावेळी राज्यात 5 हजार साखळी बंधऱ्यांचे उद्घाटन केलं, हे रेकॉर्ड झाले. चिकाटीने शासकीय काम करण्याचा हातखंडा होता आणि आपण असा हातखंडा आपल्या आयुष्यात पहिला नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 


माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आज सांगलीमधील कडेगाव तालुक्यातील वांगी येथील स्मृतिस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आठवणीतले डॉ. पतंगराव कदम या विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्या आले. काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री विश्वजित कदम या कार्यक्रमास उपस्थित होते. 


वन कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय 


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, वनमंत्री असताना वन कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर 1 दिवसात 8 हजार वन कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशात अस कोठे झाले नाही. आज विचार राहिला नाही, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, पतंगराव कदम यांच्या विचारांची ही माती आहे. या मातीतील विचार घेऊन याच भूमीतुन लढावे लागेल, आज लढाई जिंकली नाही तर समाजकारण बदलून जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 


व्यवस्था बदलण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. बहुजन समाज खितपत पडला ती व्यवस्था पुन्हा येईल, शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचारातून निर्माण झालेल्या व्यवस्थेतून निर्माण झालेली माणस विचारांशी प्रतारणा करत आहेत. 2 हजार वर्षांपूर्वी जी गुलामगिरी होती,ती गुलामगिरी करण्याची वेळ येणार आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या राजकारणावर तोफ डागली. 


पतंगराव कदम यांची जिद्द पाहण्यासारखी होती 


माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, तब्येतीची काळजी न घेतल्याने विलासराव आणि पतंगराव कदम हे दोन मोठे आपल्यातुन लवकर निघून गेले. कॅबिनेटमध्ये देखील स्पष्टपणे बोलणारे पतंगराव कदम एकमेव नेते होते. पतंगराव कदम यांची जिद्द पाहण्यासारखी होती.  सोनिया गांधी  कायम म्हणत, पतंगराव कदम हे आपले काम झाल्याशिवाय ऐकूनच घ्यायचे नाहीत. आज किती लोक महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडत आहेत? 


विश्वजित कदम बोलत असतात त्यांच्यात मला पतंगराव कदम दिसतात. आज समोर लोक गोड बोलतात आणि मागे काड्या करतात. आज आम्ही काँग्रेसचे सर्व जेष्ठ नेते विश्वजित कदम यांच्याकडे पाहतोय, विश्वजित कदम यांचे भविष्य मोठं आहे. पण त्यांना मतदारसंघात अडकवून ठेवू नका. महाराष्ट्रामधील पक्षीय वातावरण बिघडत चालले आहे, त्यात विश्वजित कदम यांच्यासारखे नेतृत्व अजून मजबूत केले पाहिजे, असे  आवाहन त्यांनी केले. 


पतंगरावांसाराखा धडाडीपणा मी पाहिला नाही


आमदार जयंत पाटील बोलताना म्हणाले की, आपण एकमेकांना भेटायची सध्या जास्त गरज आहे, मी पण विश्वजित कदम यांना भेटायला आतुर होतो. पतंगराव कदम यांच्याविषयी बोलेल तेवढे कमी आहे. आज पतंगराव हवे होते, सध्याच्या राजकारण पाहिले तर पतंगराव कदम यांची खूप उणीव भासते. पतंगराव आज असते तर आज वेगळी झळाळी त्यांनी महाराष्ट्रला मिळवून दिली असती. पतंगराव यांचे आत एक बाहेर एक असे कधी राजकारण नव्हते. पतंगराव यांनी आपल्या भागाला कधी विसरायचे नाही, आणि गद कधी सोडायची नाही हे  धोरण होते, असे त्यांनी सांगितले. 


मंत्री असताना आम्ही काही गोष्टी, घोषणा या एकत्र ठरवून करायचे. पतंगराव कदम यांच्या सारखा मोकळा मनाचा माणूस मिळणे अवघड आहे,  पतंगराव यांचासारखा धडाडीपणा मी पाहिला नाही. पतंगराव कदम यांनी जवळपास 8 खाती सांभाळली. पतंगराव यांच्यात मुख्यमंत्री होण्याइतके कर्तबगारी होती. भारती विद्यापीठ सारखे विश्व पतंगराव यांनी देशभर ग्रामीन भागागातून येऊन उभे केले हे विशेष असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या