Vishal Patil : सांगली लोकसभा (Sangli Loksabha) जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे सांगली लोकसभेला तिरंगी लढत अटळ झाली आहे. विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पक्षाने दिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार? याकडे आता लक्ष आहे. विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे स्थानिक आमदार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या हितासाठी पाटील यांनी माघार घ्यावी, असे म्हटले होते.
सांगली लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात
मात्र, सांगलीत अखेर विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिली आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. सांगली लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक बूथला दोन ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहेत.
काँग्रेसकडून विधानपरिषदेची ऑफर
दुसरीकडे, विशाल पाटील यांना स्थानिक काँग्रेस आणि विश्वजीत कदम यांचा पाठिंबा असल्याची खात्री होती, पण आता परिस्थिती बदलली आहे. विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांनी युती धर्म पाळावा यासाठी मी वैयक्तिकरित्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांना पुनर्वसनासाठी प्रस्ताव देखील दिला आहे, ते मागे घेतील अशी आशा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू पाटील यांना काँग्रेस नेतृत्वाने विधानपरिषदेला संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, विशाल पाटील यांनी पसंती दर्शवलेली नाही.
2019 मध्ये, विशाल पाटील यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, ज्यांना काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. वंचित बहुजन आघाडीच्या (व्हीबीए) तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना तीन लाखांहून अधिक मते मिळाल्याने त्यांचा 1.64 लाख मतांनी पराभव झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या