सांगलीत कृष्णा नदीकाठच्या गावांबरोबरच आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचाही शक्तीपीठला विरोध वाढला आहे. आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावामधून जाणाऱ्या शक्तिपीठसाठी सुरू झालेली जमीन मोजणी शेतकऱ्यांनी बंद पाडली. अधिकारी मोजणी करण्यास आलेल्या जमिनीवर झोपून आंदोलन करत शक्तीपीठ रद्द करण्याची  शेतकऱ्यांनी  मागणी केली. मोजणी करण्याआधी भरपाईचे निकष जाहीर करावेत अशीही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे.

शेटफळेत दुसऱ्यांदा मोजणीस सुरुवात 

आटपाडी तालुक्यात शक्तीपीठ महामार्गासाठी आज शेटफळेत दुसऱ्यांदा मोजणीस सुरुवात झाली. मात्र, शेतकऱ्यांनी तगड्या पोलिस बंदोबस्तातही मोजणीला तीव्र विरोध केला. शक्तीपीठमध्ये शेटफळे गावातील सुमारे 429 शेतकऱ्यांच्या जमिनींचा समावेश असून, 40 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित होणार आहे. महसूल विभागाने मोजणीसाठी केवळ एक दिवस आधी, म्हणजे मंगळवारी, शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या. याआधीही मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याने मोजणी रद्द करण्यात आली होती. मोजणी करण्याआधी भरपाईचे निकष जाहीर करावेत अशीही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे.

भरपाई जाहीर न करता मोजणी सुरू केल्याने नाराजी वाढली

यासंदर्भात प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दोन वेळा शेतकऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या. मात्र, प्रशासनाने यावेळी कोणतीही भरपाई जाहीर न करता मोजणी सुरू केल्याने नाराजी वाढली आहे. आज मोजणीवेळी तहसीलदार सागर ढवळे आणि पोलीस निरीक्षक विनय बहिर हे घटनास्थळी उपस्थित होते. प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही शेतकऱ्यांनी शांततेत पण ठाम विरोध नोंदवत मोजणीला विरोध केला. प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना दाद दिली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तरी आमचा याविरोधातील लढा चालूच राहील

दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जात आहे. सरकारने या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा याविरोधातील लढा चालूच राहील. हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. पाटील म्हणाले, कोल्हापूरमधून जाणारा जो महामार्ग विधानसभेच्या आधी रद्द केला होता. त्यामुळे निर्णय आल्यावर कळेल की नेमका काय निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर हायवे असताना या रस्त्याची गरज नाही. 86 हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता करण्यापेक्षा महाराष्ट्रातले असलेले रस्ते दुरुस्त करावेत, असलेल्या रस्त्यांचे खड्डे भरावेत.

गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोध

दुसरीकडे, पोलिस बळ वापरून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोध राहील, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी, किसान सभेचे राष्ट्रीय नेते राजन क्षीरसागर यांनी दिला. शेट्टी म्हणाले, राज्यातील 12 जिल्ह्यातून शेतकरी विरोध करीत आहे. मंगळवारी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतातून पळवून लावले. तरीही सरकार महामार्ग रेटत आहे. मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे. ते लुटारूंचे टोळके झाले आहे. शिवार लुटणाऱ्या पाखरांना गोफणीच्या माध्यमातून कसे टिपायचे हे शेतकऱ्यांना चांगले कळते. त्याच पद्धतीने शक्तिपीठ महामार्गाची ड्रोनने मोजणी केल्यास त्याला गोफणीने टिपले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

इतर महत्वाच्या बातम्या