Sangli Crime : वयोवृध्द आणि नवख्या बँक ग्राहकांना एटीएमधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून बँकेतील पैसे परस्पर लंपास करणार्‍याला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी पकडले. त्याच्याकडून तीन लाखांच्या रोख रकमेसह विविध बँकांची 101 एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.


जिल्ह्यातील तासगाव, इस्लामपूर, कवठेमहांकाळ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि सातारा जिल्ह्यातील म्हसवड या ठिकाणी बँकेची एटीएम बदलून पैसे काढले जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कसून शोध घेतला असता दप्तरी गुन्हे दाखल असलेला संभाजी जाधव (वय 37 रा. विटा, जि. सांगली) या संशयितावर पोलीसांना संशय आला. 


आज सकाळी विट्याहून तासगावकडे विना क्रमांकाच्या मोपेडवरून येत असता त्याला अडवून विचारणा केली असता त्याने एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल केल्याची कबुली दिली. बँकेच्या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तो ग्राहकांकडून सांकेतिक अंक विचारून घेत होता. याचवेळी एटीएम कार्डाची अदलाबदल करत असे. या बदललेल्या कार्डाद्बारे अन्य ठिकाणच्या एटीएम केंद्रावर जाऊन तो पैसे काढत असल्याचे त्यांने कबुल केले.


यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या मोपेडच्या सामान कक्षामध्ये विविध बँकांची 101 एटीएम कार्डे, रोख 3 लाख रूपये, मास्क आणि अॅक्टीव्हा कंपनीची मोपेड असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल मिळाला. त्याच्याविरूध्द तासगाव व विटा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे व घरफोडीचे गुन्हे दाखल असून एटीएम बदलून पैसे लंपास केल्याचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या