सांगली : आमदार सुमनताई पाटील व रोहित दादा पाटील यांनी कवठेमंहाकाळ नगरपंचायत साठी आणलेला 60 कोटींचा मलिदा खायला माजी खासदार संजयकाका कवठेमहांकाळला आले आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर संजयकाका वैफल्यग्रस्त झालेत, अशी घणाघाती टीका खासदार विशाल पाटील यांनी दिली. एक महिन्यानंतर रोहित पाटील लाल दिव्याच्या गाडीतून येणार असल्याचे विशाल पाटील म्हणाले. 


आबांना वेळोवेळी मारहाण झाली, तरी शांत बसले


युवा नेते रोहित पाटील म्हणाले की, आर. आर. आबांवरती हल्ला झाला. आबांना वेळोवेळी मारहाण झाली, तरी शांत बसले. आतापर्यंत शांत होतो, सबुरीने घेत होतो पण काल झालेली मारहाण माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील. पुढील 1-2 वर्षात ही मारहाण माझ्या लक्षात आहे की नाही हे दाखवून देईन, येणाऱ्या काळात ही प्रवृत्ती हद्दपार करायची आहे. संजयकाका काय करायचे ते विधानसभा निवडणूकपूर्वी करा, त्यानंतर तुम्हाला मी काहीच करू देणार नाही, असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी संजयकाकाना दिला. 


माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासहित पाच जणांच्यावर गुन्हा दाखल


दरम्यान, माजी खासदार संजय काका पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासहित पाच जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांनाही मारहाण केली, असा आरोप आहे. यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईलाही स्वतः खासदारांनी ढकलून दिले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. 


राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा


माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी कवठेमंहाकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता माजी खासदार संजयकाका  पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांनीही जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अय्याज मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. यामुळे कवठेमहांकाळ मधील वातावरण चांगलेच तापले आहे. 


कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये माजी खासदार संजय पाटील गटाला नगराध्यक्ष निवडीसाठी मदत करत असलेल्या सगरे गटाच्या नगरसेविका अनुराधा सगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्या, असे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी सांगितले. त्याविषय राग मनात धरून माजी खासदार पाटील यांनी मुल्लांना जाब विचारायला गेले असताना या वादाला सुरुवात झाली. मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याबरोबरच कवठेमहांकाळ बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर, शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या