Amit Deshmukh on Jayant Patil : माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh on Satej Patil) यांनी इस्लामपूरमध्ये वडील विलासरावांची आठवण येईल या शैलीमध्ये चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. इस्लामपुरात भावी काळाची चर्चा होत असताना इस्लामपुरात न येणं म्हणजे आम्ही आमची पंचाईत करून घेऊ, असे सांगत अमित देशमुख यांनी जयंत पाटलांच्या (Jayant Patil) मुख्यमंत्रिपदावरून भाष्य केले. जी इच्छा इस्लामपूरकरांच्या मनात आहे तीच लातूरकरांच्या मनात असल्याचे ते म्हणाले. 


जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांची आज (17 फेब्रुवारी) राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अमित देशमुख यांनी यावेळी प्रतिक पाटील यांचेही कौतुक केले. इस्लामपूर बिझनेस फोरमतर्फे 'आयबीएफ-एक्सपो या व्यावसायिक प्रदर्शनाचे अमित देशमुख आणि जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात देशमुख बोलत होते.


देशमुख आणि पाटील कुटुंबाचे पिढ्यांचे संबंध


अमित देशमुख म्हणाले की, इस्लामपूर आणि राज्यामध्ये सध्या भावी काळाची चर्चा सुरू आहे आणि ते आमच्या कानावर आलं आहे. ही भावी काळाची चर्चा ज्या इस्लामपुरातमध्ये होते त्या ठिकाणी न येऊन आम्ही आमची पंचाईत करून घेणार नाही. देशमुख आणि पाटील कुटुंबाचे पिढ्यांचे संबंध आहेत. राजारामबापू पाटलांना पाहून विलासरावांनी राजकीय प्रवास सुरु केला. हे नातं अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आलो आहे. जयंत पाटील यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देतो, असेही अमित देशमुख म्हणाले. 


अमित देशमुख यांनी प्रतिक पाटील यांच्या निवडीवरून आनंद असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ही निवड योग्य असून सहकारातील नेतृत्व तरुणाईकडे सुपूर्द केलं जात आहे याचा आनंद आहे. प्रतिक आणि राजवर्धनला जवळून पाहत आहे. थिंक ग्लोबल आणि अॅक्ट लोकल याची अनुभूती होते. पुण्यातील पोटनिवडणुकीचा निकाल हा दिशा देणारा असेल. मागील काही दिवसांमध्ये जे काही घडलं आहे ते सामान्यांना पटलेलं नाही, असेही अमित देशमुख यांनी सांगितले. 


राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक पाटील   


दरम्यान, इस्लामपुरातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक जयंत पाटील (Prateek Jayant Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे, जयंत पाटील यांनीही 1984 साली याच कारखान्याच्या संचालकपदापासून राजकीय जीवनाची सुरूवात केली होती. आता प्रतिक पाटील हे देखील पहिल्यांदाच साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या