Vishal Patil: मत चोरीच्या मुद्द्यावरून खासदार विशाल पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्या सुरात सुर मिसळत जत विधानसभा मतदारसंघातील गोपीचंद पडळकर यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत जत विधानसभेला काँग्रेसचा उमेदवार हरला नाही तर मताची चोरी करून हरवला गेला, असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला. जतमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी हा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर केला. मतचोरीच्या मुद्यावरुन जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. खासकरून जत मतदारसंघात विधानसभेल मतचोरीचा प्रकार ठरवून केला गेला. जो पाच पिढ्यापासून जत मतदारसंघातला रहिवाशी आहे त्याची जात, धर्म बघून त्याचे मतदारयादीतून नावच उडवलं आणि जो मतदारसंघातला रहिवासी नाही त्याचं मतदारयादीत नाव सापडलं असे प्रकार समोर आल्याचे खासदार विशाल पाटील म्हणाले.

 ज्या गावात 500 मतदार त्या गावात 1500 मतदान

ते म्हणाले की, ज्या गावात  500 मतदार आहेत त्या गावातील मतदान 1500 झाले. आपण गाफील राहिलो आणि त्यामुळे कुठूनही माणसं आली आणि मतदान करून गेली. जत येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी निवड कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार विशाल पाटील यांनी हा आरोप केला. यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम, जतचे माजी आ. विक्रमसिंह सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 

आजच्या राजकीय परिस्थितीकडे पाहिले तर लोकशाहीची मूल्ये धोक्यात आली आहेत हे स्पष्टपणे दिसून येईल. विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल, तर दुसऱ्या बाजूला दडपशाही आणि कटकारस्थानाचा खेळ सुरू आहे. अशा गंभीर परिस्थितीत लोकशाही वाचवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच समानता, बंधुता आणि सर्वसमावेशकतेच्या विचारांवर ठाम राहिला आहे. खासदार राहुल गांधी यांनी वोटचोरीचा मुद्दा मांडून या सरकारला उघड्यावर पाडले आहे. संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार देखील या हुकूमशाही सरकारने आपल्या पासून हिरावून घेतला आहे. मतांची चोरी करून खुलेआम हे सरकार सत्तेत आले. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने सजग राहून जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करावे असे आवाहन विशाल पाटील यांनी केले.

नेतृत्व तयार करण्याची हीच वेळ 

दरम्यान, काँग्रेस पक्षासाठी आव्हानात्मक काळ आहे, मात्र अशा काळातच संघटनेची खरी ताकद समोर येते. काँग्रेस विचारधारेचा पाया लोकशाही, समानता आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत आणि विश्वासार्हता जपणारा असून युवापिढीला तो भावतो आहे. फक्त आता विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे असे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. 

कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना राबवण्यासाठी आणि पक्षाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी सज्ज व्हायला हवे.  संघटनेतून नवे नेतृत्व तयार करण्याची, संघटन बळकट करण्याची आणि पक्षाचा झेंडा आणखी उंचावण्याची हीच वेळ असल्याचे आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणालेत. काँग्रेस ही फक्त एक राजकीय संघटना नसून विचारधारा आहे, ज्यात देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली सहिष्णुता, विकासाचा दृष्टिकोन आणि सर्वसमावेशकता आहे. या मूल्यांसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कटिबद्ध राहणे हेच आजच्या काळाचे खरे आव्हान आणि संधी आहे असे आमदार कदम म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या