Sangli News : यशवंतराव हायस्कूल देवराष्ट्रे (ता.कडेगाव) येथे काल रात्री महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 'दोस्ती ग्रहताऱ्याशी' हा आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला. खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे यांनी मुलांना “दहा न्युटोनियन दुर्बिणी'तून ग्रहताऱ्यांच्या दुनियेची सफर घडवली. संध्याकाळी साडे सात वाजता दुर्बिणीतून शनिग्रह आणि त्याचे भोवतीचे सुंदर कडे, चंद्रावरील जमिन, त्यावरील खड्डे मुलांनी पाहिले. त्यानंतर मंगळ, शुक्र तसेच गुरू ग्रह आणि त्याचे 4 उपग्रह पाहून मुले आनंदीत झाली. मृग, रोहिणी, शर्मिष्ठा या नक्षत्रांच्या तारकासमूहांची माहिती मुलांना दिली गेली. पहाटे दिसणारी सिंह रास, सप्तर्षी,चित्रा,स्वाती ही नक्षत्र मुलांना दाखवली. ध्रुवतारा अढळ कसा असतो याचा अनुभव मुलांनी या आकाश निरीक्षणात घेतला.
1300 ते 1500 प्रकाशवर्षे दूर असणारा 'ओरायन नेब्यूला' हा तेजामेघ दुर्बिणीतून पाहून मुलांचा आनंद गगणात मावेनासा झाला. रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या या सर्व ग्रह, तारे, नक्षत्र, राशी यांची शास्त्रीय माहिती खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे, विज्ञान शिक्षिका विशाखा थोरात, अनिल निटवे हे मुलांना देत होते. आपल्या ग्रह मालिकेचे नॅनो मॉडेल दाखवून ग्रह मालिकेचा प्रचंड आवाका मुलांना समजावून सांगितला. मुलांनी ग्रहण, कुंडली पत्रिका याबाबत चौकस प्रश्न विचारले त्याला शास्त्रीय उत्तरे डॉ. संजय निटवे, राहुल थोरात यांनी दिली. या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमास मुख्याध्यापक के. एच. पवार शाळेचे पर्यवेक्षक पी. टी. मोरे, शिक्षिका सुजाता मोरे, विशाखा थोरात, संगिता मोरे, शरद शिंदे,अनिल सकपाळ, सुहास महिंद, शेखर पुरके यांचे सहकार्य लाभले.
इतर महत्वाच्या बातम्या