Earthquake : आज पहाटे अफगाणिस्तानपासून ते पार महाराष्ट्रापर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. चांदोली परिसरात शुक्रवारी पहाटे 2 वाजून 22 मिनिटांच्या सुमारास 3.4 रिश्टर स्केल क्षमतेचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. 


भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा धरणापासून पश्चिमेला 200 किमी अंतरावर होता. दरम्यान वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 3.4  इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचे धक्के सौम्य असले, तरी परिसरात बर्‍यापैकी जाणवला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाली नसून धरणाला या धक्क्याची कोणतीच झळ पोहोचली नसल्याचे वारणा पाटबंधारे शाखा अभियंता वारणावती गोरख पाटील यांनी सांगितले. 


कोल्हापूरमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के 


मध्यरात्री जवळपास सव्वा दोनच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या दिंडोरीमध्ये देखील भूकंपाचे झटके जाणवले होते. त्याआधीही नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले होते. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. 






जम्मू काश्मीरमध्ये देखील भूकंप


तिकडे, जम्मू काश्मीरमध्ये देखील भूकंप झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे 3.28 वाजता जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून 62 किमी अंतरावर 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली आहे.