Sangli News : हालमत संप्रदायातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून हुलजंती (ता. मंगळवेढा) महालिंगरायाची सर्वदूर ख्याती आहे. बिरोबा व महालिंगराया यांच्या भेटीचा भक्तिमय सोहळा 16 ते 25 ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे. हन्नूरचा बिरोबा (गुरू) व महालिंगराया या गुरु-शिष्यांच्या भेटीचा पालखी सोहळा होणार आहे. हा सोहळा अभूतपूर्व असल्याने महाराष्ट्र-आंध्र प्रदेश, कर्नाटकातील लाखोच्या संख्येने भक्तगण येतात. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ असा लाखो भक्तगण अनुभवणार आहे. महालिंगरायाला मुख्य दिवशी नैवेद्याचा मान जतच्या डफळे संस्थानिकांचा असतो. पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडल्यानंतर हा भेट सोहळा लगेच पार पाडतो.


बिरोबा व महालिंगराया, या गुरु-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा दिपावाली पाडव्याच्या पूर्वसंध्येला 25 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता मुंडास बांधले जाते. मध्यरात्री कैलासमधून शंकर-पार्वती पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर करतात. यावेळी देवाची मुक भाकणूक झाली असेही आख्यायिका आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानच्या बाजूने वाहत असलेल्या ओढ्यात होणार आहे.


गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल कैताळ वाजवीत इतर पालख्या महालिंगराया पालखीची भेट घेतात. यावेळी ‘महालिंगराया-बिरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात करण्यात येते. नगारा व ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. 


हा पालखी भेट सोहळा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गोवा राज्यातून दाखल झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. या गुरू शिष्याच्या नयनरम्य भेट सोहळ्या अगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, शिरडोन येथील बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा होत आहे. महालिंगराया या वीर (सिद्ध)पुरुषाने बारामती येथे मासाळ घराण्यात जन्म घेतला. महालिंगरायानी अनेक भक्तांच्या लीलयांसाठी चमत्कार करून दाखवले. दुष्टांवर प्रहार, संहार केला. सज्जनांचे रक्षण केले. समाज जागृती केली. गुरु बिरोबा यांना गुरुस्थानी ठेवून सेवा कशी करावी, हे महालिंगरायानी आपल्या भक्तीतून दाखवून दिले आहे. 


मंगळवेढापासून दक्षिणेला अठरा किलोमीटर अंतरावर हुलजंती (दक्षिण काशी )म्हणून ओळखले जाते. या गावास धार्मिक महत्त्व देवस्थानांमुळे प्राप्त झाले आहे. बाराव्या शतकातील दगडी व कोरीव आकर्षक मंदिर बांधकाम आहे. स्वागत कमानीचे  सुरू आहे. सहाजिकच या ठिकाणी गेल्यावर थोडा वेळ थांबल्याशिवाय पुढे जाता येत नाही.


हुलजंती-महालिंगराया व जत धार्मिक संबंध


महालिंगराया हुलजंती येथील मुख्य यात्रेच्या दिवशी देवाच्या नैवेद्याचा मान जत येथील डफळे संस्थानिक राजघराण्याला आहे. महालिंगरायाचे गुरु बिरोबा देव हन्नूर (मंगळवेढा) येथील असून पूर्वी हे गाव आजच्या डफळे संस्थानिकात होते. आज ही दोन्ही देवस्थान या ठिकाणी डफळे संस्थानिकातील राजेंना मान दिला जातो. 


हन्नुर हे जत तालुक्यातील येळवी गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील देवस्थान आहे. तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून दोन्ही देवस्थान धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते. जत तालुक्यातील उटगी येथील भरमदेव, सोन्याळ येथील विठुराया या देवांच्या पालख्या या भेटी सोहळ्यासाठी मानाच्या असतात. त्यामुळे धार्मिक संबंध मोठ्या प्रमाणात आजही जोपासले जात आहे.


हालमत धर्मांची” काशी (भू कैलास)


महालिंगरायाने शिगीमठ (शिरडोण) येथे आपल्या गुरुचा मठही स्थापन केला. त्या मठात श्री महालिंगरायानी अनंतकाळ गुरुची भक्ती केली. त्याच काळात त्यानी लिंबाळ डोंगरातील वाघिणीचे दूध स्वतः काढून आणून गुरूस अर्पण केले होते. त्या वाघिणीच्या स्मरणार्थ जिंती नारायणपूर या गावाला “हुलजंती” असे नांव महालिंगरायाने ठेवले. हुलीजयंती या नावावरुनच पुढे हुलजंती हे नांव प्रचारात आले. तेच सध्याचे “हालमत धर्मांचे” काशी होय. तसेच हुलजंतीला भू कैलास असे म्हणतात, अशी आख्यायिका आहे.