Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत सांगलीमधील कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सांगली महापालिकेला जाग आली. कुपवाडमधील अतिक्रमण तत्काळ काढण्याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे माहीमनंतर आता कुपवाडमध्येही राज ठाकरे यांच्या दबावाने कारवाईचा हातोडा पडला आहे. प्रार्थनास्थळाला कोणत्याही प्रकारची परवानगी पालिकेला दिली नसल्याचे महापालिकेनं म्हटले आहे. 


राज ठाकरे यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर महापालिकेचे यंत्रणा आज खडबडून जागी झाली. नगररचना विभागाने त्या वादग्रस्त जागेचा मोजणी केली. दरम्यान, आयुक्तांच्या म्हणण्यानुसार जागा खासगी मालकीची असली तरी त्या जागेवर झालेलं बांधकाम अनधिकृत आहे. ते अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या जागेवर बांधकाम करण्यास मनपाने कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या अनधिकृत प्रार्थनास्थळवर तत्काळ कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 


सांगलीच्या कुपवाड रोडवरील सूतगिरणीनजीक मंगलमूर्ती कॉलनीत एका मशिदीच्या बांधकामावरून 26 फेब्रुवारी रोजी दोन गटांमध्ये मारामारीचे प्रकार घडला होता. सदर ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मशिदीला विरोध केला होता. त्यानंतर या ठिकाणी या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. मशीद बेकायदेशीरपणे बांधण्यात येत असून कोणतीही परवानगी नाही आणि सदर ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला होता. या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.


मनसे नेत्यांकडून पाहणी


दरम्यान, मंगलमुर्ती कॉलनीतील वादग्रस्त मशीद जागेची पाहणी आज मनसे नेत्यांनी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या जागेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये उल्लेख केला होता. त्यामुळे आज मनसे नेत्यांनी सकाळीच या जागेची पाहणी करत स्थानिक नागरिकांची संवाद साधून माहिती घेतली. यावेळी येथील नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला.


महापालिका आणि स्थानिक प्रशासनाने सदरचे बेकायदेशी बांधकाम हटवावं अन्यथा मनसे स्टाईलमध्ये आम्ही उत्तर देऊ, असा इशाराही मनसे नेत्यांनी दिला होता. या घटनास्थळी मुस्लिम समाजही दाखल झाला. जागेचा निकाल आमच्या बाजूने लागला असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कागदपत्रेही त्यांनी घटनास्थळी दाखवली. हिंदू बांधवाना जर हरकत असेल, तर त्यांनी महापालिकेत तक्रार करावी अशी भूमिका त्यांनी मांडली. 


इतर महत्वाच्या बातम्या