Sangli News: सांगलीतील मिरज तालुक्यातील सोनी येथे कौटुंबिक वादातून बाप-लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश हिंदुराव कांबळे आणि इंद्रजीत गणेश कांबळे अशी त्यांची नावे आहेत. लग्नावरून सुरु झालेल्या वादात बाप लेकाचा दुर्दैवी शेवट झाला असून ज्या घरात महिन्यापूर्वी लग्न पार पडलं त्याच घरात दोघांचा जीव गेलेला पाहण्याची वेळ कुटुंबावर आली. अवघ्या कुटुंबाचा डोलारा या घटनेनंतर कोसळला आहे. 

पसंत नसलेल्या मुलीशी विवाह झाल्याने दोघांमध्ये वाद 

मिळालेल्या माहितीनुसार इंद्रजीतचा गेल्या महिन्यात विवाह झाला होता. परंतु पसंत नसलेल्या मुलीशी विवाह झाल्याने इंद्रजीत आणि त्याचे वडील गणेश यांच्यामध्ये वाद सुरू होता. वाद विकोपाला गेल्याने गणेश यांनी सकाळी शेतात जात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका आल्यानंतर वडिलांच्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने इंद्रजीतने देखील विषारी द्रव प्राशन केले. विषारी द्रव प्राशन केल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. बापलेकावर एकाच वेळी मिरज शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे सोनी गावावर शोककळा पसरली आहे.

शेतात जाऊन विषप्राशन 

आज (4 जूलै) पहाटेच्या सुमारास गणेश कांबळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे गेले होते. यावेळी त्यांनी शेतामध्येच विष प्राशन केले. शेतात ते बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसल्याने इतर शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. गावातील रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजित व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. गणेश कांबळे यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून घेवून जात असताना, अचानक इंद्रजितनेही मागे जात कीटकनाशक प्राशन केले. 

रक्ताच्या थारोळ्यात आढळली मुंबईतील महिला डॉक्टर

दरम्यान, मुंबईतील एका महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ गाडीत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत रस्त्याकडेला मुंबईच्या महिला डॉक्टरने स्वतःच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा ब्लेडने कापून आत्महत्या केली. मंगळवारी हा प्रकार घडला. डॉ. शुभांगी समीर वानखडे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. शुभांगी वानखेडे या मुलूंड पश्चिम येथील ईएसआयसी हॉस्पिटल क्वॉटर्समध्ये राहत होत्या. दवाखान्यात न जाता शुभांगी वानखडे या कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र विठ्ठलवाडी गावच्या पांढरावडा परिसरात त्यांची एमएच 03 एआर 1896 क्रमांकाची गाडी थांबली होती. या गाडीच्या मागेच त्यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून घेतल्या होत्या. ही आत्महत्याही कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आलं असून उपसभापती निलम गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या