Sangli Mass Murder : गुप्तधनाचे आमिष दाखवून वनमोरे कुटुंबातील नऊ जणांची काळ्या चहातून विष देऊन हत्या केलेल्या मांत्रिक आब्बास बागवानला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बागवानला 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सूनावण्यात आली आहे. तो सापडल्यापासून छातीत दुखत असल्याचे ढोंग करत होता.


मात्र, पोलिसांना डॉक्टरांनी त्याला काहीच झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अटकेची कारवाई करून न्यायालयात उभे केले. पोलिसांकडून 15 दिवसांची पोलिस कोठडी मागणी करण्यात आली, पण न्यायालयाने 9 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस त्या मांत्रिकाला म्हैसाळ येथे घटनास्थळी नेऊन घटनाक्रम जाणून घेणार आहेत. 


मांत्रिकाने काळ्या चहातून विष देत म्हैसाळमधील वनमोरे कुटुंब संपवलं (Sangli Mass Murder)


मांत्रिकाने काळ्या चहातून विष देत आरोपीने वनमोरे कुटूंब संपवलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 19 जून ही गुप्तधन मिळण्याची डेडलाईन ठरली होती. या दिवशी गुप्तधन तुम्हाला भेटेलच असे वनमोरे कुटूंबाला भुलवून त्या मांत्रिकाने 9 जणांना वेगवेगळ्या खोलीत थांबण्यास सांगितले.  त्यानंतर त्याने घरातील लाईट बंद करण्यास सांगितली. लाईट बंद केल्यानंतर त्याने सर्वांना काळ्या चहातून विष देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आलं आहे.


मागील तीन ते चार वर्षांपासून हे वनमोरे बंधू या मंत्रिकाच्या संपर्कात होते. 19 जून रोजी आरोपी रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत म्हैसाळमधील वनमोरे कुटूंबाच्या घरी होते. 


आधी शिक्षक असललेल्या पोपट वनमोरे, त्यांच्या पत्नी, मुलगी यांना हा काळा चहा दिला. त्यानंतर  पोपट यांचा  मुलगा शुभमला घेऊन पशु डॉक्टर असलेल्या माणिक वनमोरेच्या घरी आले. तिथे माणिक वनमोरे, त्यांची आई, पत्नी, दोन्ही मुले आणि शुभमला चहा देण्यात आला. रात्रभर हा कट यशस्वी केल्यानंतर हे सगळे मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी पहाटे 5 वाजता म्हैसाळमधून पळ काढत सोलापूर गाठले.