Samruddhi Mahamarg Newsसमृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी केलल्या आंदोलनानंतर दोन दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र वेळ देऊनही या दरम्यान कुठलेही ठोस निर्णय न झाल्याने टोल कर्मचाऱ्यांनी टोल वसुली बंद करत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. काल रात्रीपासून ही टोल वसुली कर्मचाऱ्यांनी बंद केलीय. समृद्धी महामार्गावरील वाशिमच्या कारंजाजवळ हे आंदोलन करण्यात येत असून त्याचा मोठा फटका या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे.


टोल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसेची उडी 


गेल्या काही दिवसाअगोदरच या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद करत आंदोलन केलं होतं. मात्र दोन दिवसात तोडगा काढू, असे आश्वासन दिल्यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आपलं काम चालू केलं होतं. मात्र दोन दिवसानंतरही अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने परत काल रात्रीपासून टोलवसुली बंद करून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता या आंदोलनात मनसेने देखील उडी घेतली असून कर्मचाऱ्यांचा जो पर्यंत पगार होत नाही, तसेच त्यांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत टोल नाका सुरू करणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शवत स्वात: मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. 


आंदोलनाचा कंपनीला फायदा, तर प्रवाश्यांना भुर्दंड 


गेल्या वर्षभरापासून समृध्दी महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांनी आपल्याला वेळेवर वेतन मिळावे, पीएफ भेटत नाहीये तो मिळावा, यासोबतच सॅलरी स्लिप मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने केली. मात्र टोल कंपनीने त्यांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले.  ज्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता.5 मार्च) रोजी पहाटेपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. यामध्ये, वाशिमच्या कारंजाजवळील टोलनाका, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील माळीवाडा, सावंगी लासुर स्टेशन, जांभरगाव यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेत काम बंद केले होते. मात्र या काम बंद आंदोलनामुळे कंपनीचा किंचितही तोटा झाला नाही. याउलट आंदोलनामुळे कंपनीचा फायदा झाला. 


याचं कारण म्हणजे, समृद्धी महामार्गावर चढत असताना प्रत्येक कारची एन्ट्री होते. मात्र जर या कारची एक्झिट 48 तासाच्या आत नाही झाली तर सदरील कारच्या फास्टटॅगमधून नागपूरपासून संपूर्ण समृद्धी महामार्गाचा टोल भरावा लागतो. ज्यामध्ये कारकरीता 800 हून अधिक रुपये दंड लागू शकतो. तर ट्रकला 2800 ते साडेपाच हजार रुपये पर्यंत दंड लागू शकतो. कर्मचाऱ्यांनी जर संप केला तेव्हा चढणाऱ्या कारची एन्ट्री होते.


मात्र, एक्झिट घेणाऱ्या कारची नोंद करण्यासाठी कर्मचारी हे महत्त्वाची भूमिका बजावतात. जर कर्मचारी नसले आणि विना एक्झिट ची कार समृद्धी महामार्गावरून बाहेर पडली, तर सदरील कारचालकाच्या फास्टटॅग मधून नागपूरपासून संपूर्ण टोलचे पैसे वसूल केले जातात. यात कंपनीचा काहीच तोटा नाही, कारण स्ट्राइक केली तर कंपनीला मोठा फायदा होतो. जो टोलचा पैसा महिनाभरात जमा होत नाही, तोच एका दिवसात कंपनीला टोलचा पैसा मिळतो. ज्यामुळे यावर पर्यायी मार्ग काढण्यासाठी कंपनी उदासीन नेहमीच असते. मात्र, याचे भुर्दंड हे प्रवाशांना भरावे लागत आहे.  या सर्व बाबीवर प्रशासन लक्ष देणार का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.


आणखी वाचा