मुंबई : दीड वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोनानं ग्रासले. कोरोनाने थैमान घातल्यापासून जगभरातले जवळपास सर्वच उद्योग ठप्प होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे पगार कमी करण्यात आले. एकीकडे असे चित्र असले तरी श्रीमंतांकडील पैसा मात्र वाढत गेल्याचे चित्र दिसत आहे. आणि याचे उदाहरण आहे मुंबईत गेल्या एक वर्षात विकल्या गेलेल्या लक्झरी गाड्यांची वाढलेली संख्या. 2019-20 पेक्षा कोरोनाच्या या काळात म्हणजेच आर्थिक मंदी असतानाही 2020-21 मध्ये तब्बल दीड हजारच्या वर लक्झरी कार विकल्या गेल्यात. लक्झरी कारसाठी 20 टक्के नोंदणी शुल्क आरटीओकडे भरावे लागते. आणि त्यामुळेच आरटीओला 300 कोटींच्या आसपास नोंदणी शुल्काची कमाई झालीय. याचा अर्थ ऑटो कंपन्यांनी कोरोना काळात चांगला व्यवसाय केल्याचेच दिसत आहे.


श्रीमंत नेहमी आलिशान लक्झरी गाड्या घेतात. गेल्या काही दिवसात उद्योगपती, सेलेब्रिटी, व्यापारी आणि चित्रपट कलाकारांनीही लक्झरी गाड्या विकत घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. कलाकारांनी गाड्यांसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. आरटीओमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षात सुपर लक्झरी ब्रँड्स फेरारी आणि रोल्स रॉईसची विक्री गेल्या वर्षीपेक्षाही जास्त झाली आहे. बहुसंख्य लक्झरी कार 1 कोटी ते 4 कोटी रुपयांच्या दरम्यानच्या आहेत. दीड हजारपैकी 1414 लक्झरी कार आणि एसयूव्ही ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली येथे नोंदणीकृत करण्यात आलेल्या आहेत. हे चारही विभाग उच्चभ्रूंचे आहेत.


2020-21 मध्ये 453 बीएमडब्ल्यू, 737 मर्सिडीज बेंझ, 156 जग्वार/लँडरोव्हर, 10 रोल्स रॉयस, 8 फेरारी आणि 16 पोर्शे गाड्यांची विक्री झाली आहे. तर लक्झरी गाड्यांच्या शोरूममध्ये सहा महिन्यांची वेटिंग लिस्ट असल्याचंही सांगितले जात आहे. जर हे खरे असेल तर हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत लक्झरी कार विक्रीचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.


लक्झरी कार विक्रीबाबत असे म्हटले जाते की, कोरोना काळात प्रवास करता येत नसल्याने उच्चभ्रूंना परदेशात सहलीसाठी जाता आले नाही. त्यामुळेच त्यांनी हा पैसा लक्झरी कार खरेदी करण्याकडे वळवला. तसेच कोरोना काळात काही उद्योग आर्थिक संकटात सापडले असले तरी फार्मा, स्टॉक ब्रोकिंग फर्म, निर्यातदारांची कमाई वाढली. त्यामुळे या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही लक्झरी गाड्या घेण्याकडे कल वाढला. त्यामुळेच लक्झरी गाड्यांची विक्री गेल्या आर्थिक वर्षापेक्षा वाढली आहे. 125 मर्सिडीज बेंझ कार तर फक्त तीन दिवसांत विकल्या गेल्या.