मुंबई :  व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवल्याने आता शेतमाल विकण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरलं आहे. मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्रीला उतरवला. दादरच्या मार्केटमध्ये ३०० गाड्यांची आवक झाली.

 

यावेळी स्वत: सदाभाऊ खोत हे रस्त्यावर उतरुन मार्केटची पाहणी करत होते. नुकतंच सदाभाऊ खोत यांनी कृषी आणि पणन राज्यमंत्रीपदाचा भार स्वीकारला आहे. त्यानंतर लगेचच सदाभाऊ कामाला लागले आहेत.  सदाभाऊ खोत यांनी आज पहाटेच दादर मार्केटमध्ये हजेरी लावली.

 

शेतकऱ्याला पुन्हा अडचणीत आणू नका

"व्यापाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्यांच्यासाठी सरकारकडून चर्चेची दारं खुली आहेत. तीन-चार वर्षांपासून शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पुन्हा एकदा शेतकऱ्याला अडचणीत आणू नका. शेतकऱ्याची सद्यस्थिती पाहून, पणन विभागाने शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांना विकता यावा अशी यंत्रणा उभी केली. महापालिकेच्या भाजी मंडईत आज भाजीपाला पोहोचला. उद्यापासून पुन्हा गाड्या वाढवू", असं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.

 

शेतकरी पिकवायला आणि विकायलाही शिकतोय

पूर्वी माझा शेतकरी पिकवायला शिकला होता, मात्र विकायला शिकला नव्हता. आता स्थिती बदलत आहे, शेतकरी पिकवायला आणि विकायलाही शिकतोय याचा आनंद आहे. सरकार तुमच्या बाजूचं आहे, तुम्ही चिंता करु नका. हा दिलासा मी शेतकऱ्याला देतो, असं आश्वासन सदाभाऊंनी दिलं.

 

तोडगा न निघाल्यास कडक पावलं उचलू

बाजार समित्यांबाबत उद्या बैठक बोलावण्यात आली आहे. उद्या तोडगा निघेल अशी आशा आहे. चर्चेने प्रश्न सोडवू, पण तोडगा निघालाच नाही, तर सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही, कडक पावलं उचलू. व्यापाऱ्यांना शेतकरी आणि ग्राहकांना कोंडीत पकडून देणार नाही, असं सदाभाऊंनी ठणकावलं.