अहिल्यानगर : बीड जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ओळखला जातो. याच बीड जिल्ह्यात बहुजन समाजाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या होते. मात्र तरीही पंकजा मुंडे या शांत आहेत. या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटत असून जेव्हा त्यांचा पराभव झाला होता, तेव्हा त्या सतत सांगत होत्या की सत्ता मिळाली, पाहिजे सरकार यायला पाहिजे. आता त्याच पंकजा मुंडे शांत का बसल्या आहेत? पंकजा मुंडे यांनी बोलायला पाहिजे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही या प्रकरणी आवाज उठवा आम्ही तुमच्याकडे एक मागणी करतो की, तुम्ही एक महिला नेता आहात तुम्ही मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांना भेटा आणि याप्रकरणी आवाज उठवा, असे आवाहन आरपीआयचे खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पंकजा मुंडे यांना केले आहे.

Continues below advertisement


धनंजय मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा


मस्साजोग प्रकरणाबाबत धनंजय मुंडे यांनी थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाहीत, पण थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे मित्रच आहेत ना? या प्रकरणाला खंडणीपासून सुरुवात झाली आहे. मग धनंजय मुंडे यांचे मित्र वाल्मिक कराड हे खंडणी प्रकरणात आरोपी असतील तर धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, असं आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी म्हटले आहे.


सचिन खरात परभणी आंदोलनात सहभागी होणार


परभणी येथील घटनेसंदर्भात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या आंदोलनात आजपासून  सहभागी होणार असल्याचे आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी सांगितले. राज्य सरकारने या घटनेतील मयत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला कोणतीही मदत अद्याप केलेली नसून मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा, तसेच भिमसैनिकांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खरात यांनी दिला आहे.


धनंजय मुंडे धाराशिवचे पालकमंत्री नको, सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन


मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांच्याशी असलेले धनंजय मुंडे यांचे संबंध पाहता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी बीडमध्ये होत आहे. तसेच त्यांच्या पालकमंत्री पदालाही विरोध होत आहे. धनंजय मुंडे धाराशिवचे पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर बीड पाठोपाठ आता धाराशिव मधूनही धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला विरोध होत आहे. बीडचा बिहार केला, धाराशिवचा बिहार नको. आम्हाला धनंजय मुंडे पालकमंत्री नको, असा निवेदन सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. 


हे ही वाचा