मुंबई : कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरात अंमली पदार्थ विरोधी विभागाने छापा टाकला. छाप्यानंतर भारती आणि हर्ष यांना घेऊन एनसीबीचं पथक रवाना झालं आहे. ड्रग पेडलरच्या माहितीवरुन समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या पथकाने मुंबईतील अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत गांजा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनमध्ये आतापर्यंत आश्चर्यचकित करणारी अनेक नावं समोर आली आहेत. यामध्ये आता भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया याचा समावेश आहे. ड्रगशी संबंधित तपास करण्यासाठी एनसीबीचं पथक आज सकाळी सातच्या सुमारास अंधेरीतील भारतीच्या घरात पोहोचलं. सूत्रांच्या मते भारतीच्या घरात गांजा सापडला आहे. परंतु किती प्रमाणात गांजा सापडला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यानंतर एनसीबीने त्यांना समन्स बजावलं आणि दोघांना चौकशीसाठी घेऊन गेले आहेत.


बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीपासून याची सुरुवात झाली आणि त्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्यासह अनेक नावं समोर आली आणि त्यांची चौकशीही झाली आहे.


कोण आहे भारती सिंह?
भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. सध्या ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करत आहे. भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केलं. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. यानंतर तिने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केला. यामध्ये कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ यांचा समावेश आहे.


Drug connection | कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी एनसीबीचा छापा