मुंबई : लॉकडाऊनने अनेक नव्या अडचणी समोर आणल्या. फिल्म इंडस्ट्रीबद्दल म्हणाल तर तयार झालेले सिनेमे आता रिलीज कसे आणि कुठे करायचे हा त्यातला मोठा प्रश्न होता. काहींनी लॉकडाऊनची कळ सोसली. पण काहींना सिनेमे प्रदर्शित करणं गरजेचं होतं. लॉकडाऊन काळात ओटीटीचा वाढता वापर लक्षात घेऊन अनेकांनी आपलं नवं नियोजन सुरु केलं. हे होतं, ओटीटीवर सिनेमे रिलीज करण्याचं. सिनेमे ओटीटीवर रिलीज होऊ लागले. गुलाबो सिताबो, शकुंतला देवी, लक्ष्मी, लुडो, गुंजन सक्सेना, सडक 2 असे अनेक सिनेमे आले. पण आता यातून आणखी एक नवी अडचण समोर उभी राहिली आहे.


ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार करुन अनेक निर्मात्यांनी सिनेमे ओटीटीवर आणले खरे. पण त्यातून नवा निकाल समोर आला. सिनेमात कोणीही मोठा नट असो सिनेमा चालेल याची शाश्वती ओटीटीवर दिसेना. अमिताभ बच्चन, आयुषमान खुराना, विद्या बालन, संजय दत्त, अलिया भट आदी अनेक मंडळी वेगवेगळ्या चित्रपटांतून ओटीटीवर आली. पण त्याचा परिणाम जो अपेक्षित होता तो झाला नाही. हे सगळे सिनेमे पडले. पडले म्हणजे त्यांनी अपेक्षित यश मिळवलं नाही. यात अपवाद होता केवळ सुशांत सिंह राजपूतचा. केवळ त्याचा सिनेमा चालला. त्यालाही कारण होतंच. सुशांतच्या जाण्याने त्याचं सगळे फॅन्स नाराज होते. शिवाय नेपोटिझमचा मुद्दाही चर्चेत होता. या सगळ्याचा परिणाम सुशांतच्या चित्रपटावर झाला आणि सिनेमा चालला. पण बाकीच्या सिनेमाबद्दल प्रकरण अवघड झालं. म्हणूनच ओटीटीवाल्यांनीही सिनेमे घेणं थांबवलं.


या सगळ्याचा परिणाम आगामी हिंदी मोठ्या सिनेमांवर होतो आहे. आता या वर्षी एकीकडे थिएटर्स पुन्हा एकदा खुली होऊ लागली आहेत. अशात दोन महत्वाचे सिनेमे ओटीटीवर येणार आहेत. त्यातला एक आहे कुली नंबर 1 आणि दुसरा आहे भूज. वरुण धवन आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असणारे हे चित्रपट ओटीटीवर आणावेत की नाही यावर आता निर्माते विचार करत आहेत. एकीकडे या कुली नंबर 1 ने आपली तारीखही जाहीर केली आहे. अशात हे सिनेमे पाहिले जातील की नाही, किंवा आपण सिनेमे थिएटर्समध्ये रिलीज करावेत की काय अशा विचारात निर्माते आहेत. याबद्दल बोलताना तिकीटबारीचा अभ्यास करणारे युसुफ म्हणाले, "आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमाच्या तिकीटबारीवर लक्ष ठेवतो आहे. पण ओटीटीवर पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांचा अंदाज लावता येत नाही. कारण, संबंधित ओटीटीचा पासवर्ड दुसऱ्याला देऊन तो सिनेमे पाहिले जातात त्याचा ओटीटीला फायदा नसतो. ओटीटी आणि सिनेमावाले यांच्या लक्षात ही गोष्ट आली आहे. त्यामुळेच ओटीटीने सिनेमे घेणं तूर्त थांबवलं आहे. आता कुली आणि भूजबद्दल काय निर्णय होतो ते कळेल लवकरच.