परभणी : यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. मात्र पावसाळा संपत आला तरीही राज्यातील 36 पैकी 21 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात फक्त दोन जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस बरसला, तर 35 पैकी फक्त पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात परतीचा पाऊसही राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये बरसणार नसल्याचा अंदाज असल्याने, राज्यातील अनेक भागांवर दुष्काळाचं संकट घोंगावत आहे.


245 तालुक्यांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्यानंतर एक वर्षे पावसाने चांगला दिलासा दिला. परंतु यावर्षी पुन्हा एकदा पावसाने दगा दिला असून, राज्यातील 254 तालुक्यात सप्टेंबर महिन्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यात 15 जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा संपत आला तरीही 45 तालुके अद्यापही पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती भयावह बनत आहे. त्यात वाढते तापमान आणि परतीच्या पावसावर आशा लावून बसलेला शेतकऱ्याला आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे धास्ती बसली.

पीक वाया जाण्याची वेळ

थोड्याफार फरकाने राज्यभरामध्ये हीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या, त्यानंतर पावसाने सुरुवातही चांगली दिली. पण आता मोठ्या उघडीमुळे शेतातील पीक वाया जात असून, केलेला सर्व खर्च वाया जाणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसोबत, फळबागा, भाजीपाला यांची अवस्थाही बिकट बनली आहे. पावसाच्या भाकितामुळे अनेकांनी ऊसासारखे पीक लागवड केली होती.

राज्यभरात खरीप हंगाम सुरू आहे .या हंगामात शेतकरी सोयाबीन, मुग, उडीद, कापूस आणि काही प्रमाणात ऊसाची लागवड करतो. यावेळी देखील पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी जवळ असेल ते विकून पेरण्या केल्या. पण अवेळी पावसाने राज्यातील अनेक तालुक्यांकडे पाठ फिरवली. त्यामुळे लावलेले पिक वाळून जातंय. सोयाबीनला आलेल्या शेंगा तर वाळून त्यातील बिया खाली पडतात. याला कंटाळून शेतकरी आता उभ्या पिकावर नांगर फिरवू लागलाय.

अल्पभूधारक शेतकरी अडचणीत

पावसाचे चांगले भाकीत असताना, राज्यातील 254 तालुक्यांमध्ये 25 टक्के पेक्षा कमी पाऊस पडला. त्यात 45 तालुक्यांमध्ये तर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. यामुळे मोठ्या शेतकऱ्यांसोबत अल्पभूधारक शेतकरीही अडचणीत आलाय. अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये दोन एकर, तीन एकर अशी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी हजारो आणि लाखोंचा खर्च करत शेतीच्या मशागती आणि पेरण्या केल्या. पेरण्या केल्यापण पावसाने दगा दिल्याने हातामध्ये काहीही पडणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे.

मागील तीन-चार वर्षांपूर्वी मराठवाड्यात भयावह दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळानंतर पावसाने थोडस दिलासादायक चित्र निर्माण केलं. यातून शेतकरी बाहेर पडत असताना, यावर्षी पुन्हा निसर्गाच्या संकटाला सामोरे जावे लागण्याच्या चिंतेने शेतकरी हतबल झालाय. पिकांसोबत या गायब झालेल्या पावसाचा परिणाम  सगळीकडच्या पाणीसाठ्यांवर दिसून येतोय. पाण्याचे मोठे मोठे तलाव, शेततळे आणि विहिरींनी तळ गाठला आहे. याचा परिणाम पिकाचे सोडाच, पण पिण्याच्या पाण्यावरही होणार आहे. त्यामुळे आतापासूनच याचे नियोजन करणे गरजेचे बनले आहे.