Investment in Real Estate :  रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) अनेकजण गुंतवणुकीसाठी (Investment) योग्य पर्याय म्हणून प्राधान्य देतात. जर थोड्या समजुतीने गुंतवणूक केली तर रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कोरोना महासाथीनंतर प्रॉपर्टी मार्केटमध्ये (Property Market) तेजी दिसून येत आहे. लोकांचा घरे घेण्याकडे कल वाढत चालला असल्याने घरांची मागणी वाढली आहे. चांगल्या परताव्याच्या आशेने रिअल इस्टेटमध्ये (Real Estate Investment) पैसे गुंतवणाऱ्या लोकांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, रेडी टू मुव्ह मध्ये गुंतवावे की अंडर कन्स्ट्रक्शन अर्थात बांधकामाधीन प्रकल्पात गुंतवावे असा अनेकांसमोर पेच निर्माण होतो.


रेडी-टू-मूव्हचा हा फायदा


'रेडी-टू-मूव्ह-इन' फ्लॅट्स खरेदी करताना मागणी नसलेल्या इमारती, काही वर्षे जुन्या इमारतीमध्ये फ्लॅटस उपलब्ध असतात. हे फ्लॅटस पूर्ण असल्याने त्यांची रचना, बांधकाम याचा अंदाज येतो. त्यामुळे तुम्हाला घराची योग्य किंमत कळू शकते.  सहसा असे फ्लॅट पुनर्विक्रीमध्ये विकले जातात.  कोणीतरी विकासकाकडून विकत घेतले आणि नंतर ते विकले जातात. रेडी-टू-मूव्ह फ्लॅटसचा फायदा म्हणजे तुम्ही लगेच शिफ्ट होऊ शकता. यामध्ये जीएसटीसह इतर शुल्क भरावे लागणार नाहीत. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला फक्त ईएमआय भरावा लागेल.


स्वस्तात मिळतात घरे 


रेडी-टू-मूव्ह फ्लॅटच्या किमती स्थान, बांधकाम गुणवत्ता, फ्लॅटचे आयुर्मान आणि मालमत्ता बाजाराची स्थिती यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. या आधारावर मालमत्तेची किंमत कमी-अधिक असते. मालमत्तांचे पुनर्विक्री स्वस्त होण्याचे एक कारण म्हणजे मालमत्ता जसजशी जुनी होत जाते तसतसे तिचे मूल्यही कमी होत जाते. नवीन घराच्या तुलनेत त्याच जुन्या घराची किंमत कमी असेल हे उघड आहे.


अंडर कंस्ट्रक्शनची सर्वात मोठी जोखीम


जोपर्यंत बांधकामाधीन सदनिकांचा संबंध आहे, अशा मालमत्तेचा सर्वात मोठा धोका म्हणजे ताबा मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असते.  सहसा बांधकाम व्यावसायिक 3-4 वर्षांत फ्लॅट देण्याचे आश्वासन देतात आणि नंतर त्याचा ताबा देण्यास उशीर करतात. अशी अनेक प्रकरणे आपण पाहतो.  मालमत्ता सल्लागार फर्म एनारॉक कडील माहितीनुसार, एकट्या दिल्ली-NCR मध्ये नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये 1.18 लाख कोटी मूल्य असलेले 1.65 लाख फ्लॅट अडकले आहेत. यामध्ये 2014 किंवा त्यापूर्वी सुरू झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. त्याच वेळी, मे 2022 पर्यंत देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये 4.48 लाख कोटी रुपयांची सुमारे 4.8 लाख घरे अडकली आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये अशा घरांची संख्या 2.40 लाखाच्या घरात आहे.


ही बाब लक्षात ठेवा


बांधकामाधीन असलेल्या मालमत्तेचे पूर्ण पैसे त्वरित भरावे लागणार नाहीत. परंतु बांधकामाशी जोडलेल्या योजनेअंतर्गत हप्त्यांमध्ये पैसे दिले जाऊ शकतात. विकासकाने गडबड केल्यास तुम्ही RERA मध्ये तक्रार करू शकता. अशे फ्लॅटस प्रोजेक्ट लॉन्चच्या वेळी कमी किंमतीत उपलब्ध असतात आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत, परिसरात विकासामुळे मालमत्तेच्या किमती वाढतात. यामुळे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो.


 आणखी एक मुद्दा म्हणजे की आता बांधकामाधीन (अंडर कन्स्ट्रक्शन) आणि रेडी टू मुव्ह मालमत्ता, फ्लॅट्सच्या किमतींमधील तफावत कमी होत आहे. एनारॉकच्या अहवालानुसार, 2021 च्या पहिल्या तिमाहीत, रेडी टू मुव्ह आणि बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या किमतींमध्ये फक्त 3 ते 5 टक्के फरक होता. 2017 मध्ये ही तफावत 9 ते 12 टक्के इतकी होती.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी आहे. रिअल इस्टेट मार्केटमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. ABPLive.com कडून  गुंतवणुकीबाबत कोणताही सल्ला दिला जात नाही.)