Lok Sabha Election : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election) शिवसेनेचे साडेआठ लाख मतदार आहेत, म्हणून आम्ही या मतदारसंघावर दावा केला असं सांगत राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी भाजपला खोचक टोला लगावला. कितीही मोठा उमेदवार असेल तरी त्याचा पराभव करु असं विनायक राऊत म्हणाले होते, यावर उदय सामंत यांनी चार महिन्यानंतर यावर बोलू अशी प्रतिक्रिया दिली. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणाहून लोकसभेची तयारी करत आहेत. 


उदय सामंत म्हणाले की, शिवसंकल्प अभियान बाळासाहेबांची शिवसेना सुरू करत असून येत्या 8 जानेवारीला कोकणात रत्नागिरीमध्ये पहिली जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या विजयाची ही नांदी असेल. या मतदारसंघावर आम्ही दावा केला आहे. शिवसेनेची ताकद इथे मोठी असल्याने आम्ही दावा केला आहे. 


वैभव नाईक हे कॉलेजपासून मित्र आहेत, त्यामुळे राजकरण बाजूला ठेऊन बोलू. माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, मात्र वैभव नाईक यांनी देवळात येऊन नारळाला हात लावून पाणबुडी प्रकल्प कोणामुळे गेला हे सांगावे. आदित्य ठाकरेंनी यावर काम केलं नाही. प्रकल्पाला की विरोध करायचा आणि प्रकल्प आला की आमच्यामुळे प्रकल्प आला असे सांगायचं तर काही नेत्यांची स्टाईल आहे.


आता अंबानी टार्गेट


कोकणातील प्रकल्पावरून उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले की, अडीच वर्षात काही लोकांचे टार्गेट हे अंबानी होते. तसं आता अदानींना टार्गेट केलं जात आहे. कुडाळ तालुक्यातील आजीवडे मधील अदानींच्या प्रकल्पाला मी स्वतः भेट देणार आहे. सचिन वाझे यांना पोलीस अधिकारी म्हणून आणून त्यांना अंबानी यांच्या घरी स्फोटके ठेवली. आता सरकार गेल्यापासून अदानी टार्गेट आहे. उद्धव ठाकरे अदानींच्या विरोधात भूमिका घेतात, मात्र तीन दिवसापूर्वी शरद पवार आणि अदानींची भेट झाली, याचं उत्तर त्यांच्याकडे आहे का?


शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा दावा


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने या आधीच दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणाहून निवडणूक लढतील असं आधीच जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर आता भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना या ठिकाणाहून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


ही बातमी वाचा: